दिव्यांगांसाठी ऑनलाइन प्रणाली सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 12:11 AM2019-01-29T00:11:37+5:302019-01-29T00:12:08+5:30
महापालिकेचा उपक्रम; स्वीकारमुळे दिव्यांगांची माहिती संकलित होणार
नवी मुंबई : दिव्यांगांना सर्व प्रकारच्या सुविधा एकाच छताखाली उपलब्ध व्हाव्या यासाठी महापालिकेने ईटीसी अपंग शिक्षण व प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे. शहरातील सर्व दिव्यांगांची माहिती संकलित करावी व नोंदणी करता यावी यासाठी महापालिकेने स्वीकार ऑनलाइन प्रणाली सुरू केली आहे.
यापुढे महापालिकेच्या संकेतस्थळावर शहरातील दिव्यांग व्यक्ती आपले नाव नोंदवू शकतात. अपंग अधिनियम २0१६ नुसार मतिमंदत्व, स्वमग्न, सेरेब्रल पाल्सी, मानसिक रोगी, कर्णबधिरत्व, वाचा व भाषा दिव्यांगत्व, अंधत्व, अल्प दृष्टी, अस्थिव्यंग, कुष्ठरोगमुक्त, बुटकेपण, अॅसिड हल्ला बळी, मांसपेशी दुर्विकास, अध्ययन अक्षमता, बौध्दिक दिव्यांगत्व,मल्टिपल स्कलेरोसिस, पार्किंन्सस, हिमोफेलिया, थॅलेसेमिया, सिकलसेल आजार विकलांग, बहु दिव्यांग हे २१ दिव्यांग प्रवर्ग असून यामध्ये असणाऱ्या दिव्यांग व्यक्तींची नाव नोंदणी संकेतस्थळावर केली जाऊ शकते. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी महापौर जयवंत सुतार व आयुक्त रामास्वामी एन. यांच्या उपस्थितीमध्ये स्वीकारची सुरवात करण्यात आली.
या प्रणालीचा उपयोग दिव्यांगाकरिता राबविण्यात येणाºया विविध योजनांचा लाभ घेण्याकरिता तसेच दिव्यांग व्यक्तींना प्रमाणपत्र उपलब्ध करून घेण्यास सहाय्यभूत ठरणार आहे. यामुळे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींची एकत्रित माहिती संकलित होणार असल्याने त्याचा उपयोग विविध प्रकारचे सेवाभावी काम करण्यासाठी पालिकेला होणार आहे. अपंग कल्याण आयुक्तालयामार्फत २६ जानेवारीपासून ‘दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियान’ अंतर्गत ओळखपत्र वितरण करण्याच्या दृष्टीने तालुकास्तरीय शिबिरे आयोजन करण्यात येत आहेत.
पालक सुसंवादी अॅप
महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पालकांना शाळेशी जोडण्यासाठी एनएमएमसी ईडीयू स्मार्ट हे अभिनव मोबाइल अॅप सुरू करण्यात आले आहे.
या अॅपद्वारे विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती, प्रगती, परीक्षेचे वेळापत्रक, शाळेकडून देण्यात येणाºया सूचना, निकाल, पालक सभा व इतर माहिती देण्यात येणार असून प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी या अॅपची सुरवात करण्यात आली आहे.