नवी मुंबई शहरात पावसाची संततधार; ठिकठिकाणी साचले पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 11:16 PM2020-08-28T23:16:00+5:302020-08-28T23:16:10+5:30
७८.६६ मिमी पावसाची नोंद
नवी मुंबई : गणेशोत्सव सुरू झाल्यापासून विश्रांती घेतलेल्या पावसाची संततधार शुक्रवारी, २८ आॅगस्ट रोजी सकाळपासूनच सुरू झाली. दुपारनंतर पावसाचा जोर वाढला. दिवसभरात शहरात ७८.६६ मिमी पावसाची नोंद झाली.
सानपाडा येथील रेल्वे पुलाखाली, तसेच मॅफको मार्केटमध्ये पावसाचे पाणी साचले होते. शहरात ठिकठिकाणी पाणी साचल्याने वाहने बंद पडण्याच्या घटना घडल्या. शुक्रवारी सातव्या दिवसाच्या गणेशमूर्तींचे विसर्जन असल्याने, विसर्जनासाठी तलावांवर येणाऱ्या भक्तांची धावपळ झाली. पावसामुळे सकाळी कामावर जाताना, तसेच संध्याकाळी घरी परतत असताना नागरिकांची धावपळ उडाली. बेलापूर ७३.०८ मिमी, नेरुळ ७५.०४ मिमी, वाशी ९१.०५ मिमी, कोपरखैरणे ९०.०८ मिमी आणि ऐरोली विभागात ६१.०८ मिमी पावसाची नोंद झाली.
पनवेलमध्ये ९० मिमीपेक्षा जास्त पाऊस
पनवेलमध्ये मागील काही दिवस उसंत घेतल्यानंतर शुक्रवारी पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावली. यावेळी सखल भागात पाणी साचले होते. दिवसभरात ९० मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे.
अनेकांनी गणेशेत्सवात घरीच थांबणे पसंत केल्याने मुसळधार पावसात रस्त्यावर नेहमीपेक्षा कमीच गर्दी दिसली. गुरुवारी मध्यरात्री सुरू झालेला पावसाचा जोर शुक्रवारी कायम होता. दरम्यान, तालुक्यातील गाढी, कसाडी या नद्या यावेळी ओसंडून वाहत असल्याचे पाहावयास मिळाले. तालुक्यात एक दोन ठिकाणी झाडे उन्मळून पडली. सायन-पनवेल, कळंबोली-मुंब्रा, मुंबई-गोवा महामार्गावर काही ठिकाणी पाणी साचले.