नवी मुंबई : शहरातील स्मशानभूमींच्या देखभालीसाठी सर्वसमावशेक कंत्राट काढण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. परिमंडळ दोनमधील सर्व स्मशानभूमींची देखभाल करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीकडे पाठविण्यात आला असून, या कामासाठी वर्षाला ७१ लाख ३० हजार रुपये खर्च होणार आहेत.
नवी मुंबई महानगरपालिकेने स्मशानभूमी व्हिजन राबवून शहरातील सर्व स्मशानभूमींचे नूतनीकरण केले आहे. प्रत्येक स्मशानभूमीमध्ये बर्निंग स्टॅण्ड, पाणी, वीज व इतर सर्व सुविधा व्यवस्थित राहतील याची दक्षता घेण्यात आली आहे. स्मशानभूमींची नियमित देखभाल करणे आवश्यक आहे. हे काम व्यवस्थित व्हावे, यासाठी परिमंडळनिहाय ठेकेदाराची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली व दिघा परिसरातील स्मशानभूमीच्या देखभालीसाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. सर्व ठिकाणी बर्निंग स्टॅण्ड बसविणे, सिमेंटचे पत्रे, बर्निंग स्टॅण्डची दुरुस्ती करणे, प्रसाधानगृह, स्टोअर रूम, पाण्याची टाकी, वीजपुरवठा व इतर सर्व कामे या ठेकेदाराकडून करून घेतली जाणार आहेत. स्मशानभूमीची साफसफाई करणे, अंत्यविधीसाठी आवश्यक लाकूड, डिझेल व इतर साहित्य उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
देखभालीच्या कामासाठी महापालिकेने निविदा मागविल्या होत्या. ७१ लाख ३० हजार रुपये किमतीचा प्रस्ताव तयार करून तो मंजुरीसाठी स्थायी समितीकडे पाठविण्यात आला आहे. स्थायी समितीच्या मंजुरीनंतर ठेकेदाराला परिमंडळ दोनमधील सर्व स्मशानभूमीच्या कामाच्या देखभालीची जबाबदारी दिली जाणार आहे.