नवी मुंबई : महापालिकेच्या सर्वच विभागातील कंत्राटी कामगारांनी सोमवारी पालिका मुख्यालयावर धडक दिली. प्रलंबित मागण्या व थकबाकी मिळावी यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी टीडीएस न कापता कामगारांना थकबाकी अदा करावी व रक्कम कापली असल्यास ती परत करण्याचे ठेकेदारांना सूचना देण्याचे आश्वासन आयुक्त रामास्वामी एन. यांनी शिष्टमंडळाला दिले.
भविष्य निर्वाह निधी स्वरुपात पालिकेने ठेकेदारांकडे २३ कोटी रुपये दिले आहेत. मात्र ती रक्कम कामगारांपर्यंत पोहचेल की नाही याबाबत कामगारांमध्ये संशय आहे. त्यामुळे या प्रक्रियेत पारदर्शकता यावी तसेच थकबाकीची रक्कम कामगारांना मिळावी व भविष्य निर्वाह निधीसह इतर मागण्यांसाठी कंत्राटी कामगारांनी सीबीडी येथील पालिका मुख्यालयावर धडक दिली. समाज समता कामगार संघाच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी पालिका आयुक्त रामास्वामी एन. यांनी दोन दिवसात संयुक्त बैठक आयोजित करून भविष्य निर्वाह निधीचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले.
तसेच ७०० रु पयांची थकबाकी, राहणीमान भत्ता सुधारित दराने दिवाळी बोनस व रजा रोखीकरण या सर्व मागण्या चार दिवसात निकाली काढण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले.
मात्र वेळीच त्याची पूर्तता न झाल्यास ऐन दिवाळीत काम बंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा समाज समता कामगार संघाचे अध्यक्ष किशोर गजभिये यांनी दिला आहे. सदर बैठकीस दादासाहेब निकाळजे, मंगेश लाड, गजानन भोईर, संतोष पाटील, राहुल कदम, पद्मा दासरी आदी उपस्थित होते.