खंडणी नाकारल्याने ठेकेदारावर ब्लेडने वार, ऐरोलीतली घटना
By सूर्यकांत वाघमारे | Published: January 22, 2024 06:32 PM2024-01-22T18:32:07+5:302024-01-22T18:35:08+5:30
आकाश यादव (३२) असे हल्ल्या जखमी झालेल्या ठेकेदाराचे नाव आहे.
नवी मुंबई : बुद्ध विहाराचे काम करणाऱ्या ठेकेदाराकडे खंडणी मागूनही त्याने नाकारल्याने त्याच्यावर वार केल्याची घटना घडली आहे. यामध्ये ठेकेदार जखमी झाला असून एकावर रबाळे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आकाश यादव (३२) असे हल्ल्या जखमी झालेल्या ठेकेदाराचे नाव आहे. त्यांना गतवर्षी ऐरोली सेक्टर २ येथे बुद्ध विहार उभारणीचे काम मिळाले होते. त्यानुसार ते त्याठिकाणी काम करत असताना चेतन चव्हाण नावाच्या तरुणाने त्यांच्याकडे पैशाची मागणी केली होती. विभागात काम करायचे असेल तर आपल्याला पैसे द्यावे लागतील असे त्याने धमकावले होते. परंतु यादव यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष करत पैसे नाकारले होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वी पुन्हा त्याने फोन करून यादव यांच्याकडे पैशाची मागणी केली होती असा त्यांचा आरोप आहे. त्यावेळी देखील त्यांनी त्याला पैसे देण्यास नकार दिला होता.
रविवारी दुपारी चेतन याने यादव यांना फोन करून एका घराच्या कामाच्या बहाण्याने त्यांना भेटीसाठी बोलवले होते. त्यानुसार दोघे समोरासमोर भेटले असता झालेल्या वादातून चेतन याने ब्लेडने यादव यांच्यावर वार केले. तसेच त्याने आपल्याकडे असलेली ४८ हजाराची रोकड देखील लुटून नेल्याचंही आरोप त्यांनी केला आहे. हल्ल्यात जखमी झाल्यानंतर त्यांनी रुग्णालयात उपचार घेऊन पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यानुसार चेतन चव्हाण याच्यावर सोमवारी सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरु असल्याचे रबाळे पोलिसांनी सांगितले