नामदेव मोरे , नवी मुंबईठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी पालिका रुग्णालयातील व्हेंटिलेटर व डायलेसिस मशिनसाठी दिलेला ९५ लाख रुपयांचा निधी पालिकेने नाकारला आहे. जिल्हा नियोजन समितीने दिलेले ४७ लाख ६० हजार रुपये पुन्हा त्यांना देण्यात आले आहेत. दुसरीकडे सीटी स्कॅन व डायलेसिस सुविधा खासगीकरणाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्यासाठी पाच वर्षांत जवळपास १२ कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून याचे तीव्र पडसाद सर्वसाधारण सभेमध्ये उमटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नवी मुंबई महापालिकेची आरोग्य यंत्रणा कोलमडू लागली आहे. शहरवासीयांना चांगल्या सुविधा देण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. रुग्णालयीन सुविधा दर्जेदार मिळवून देण्यासाठी फारसे गांभीर्याने प्रयत्नही होताना दिसत नाहीत. ठाणे मतदार संघाचे खासदार राजन विचारे यांनी रुग्णालयांना भेट दिल्यानंतर त्यांच्या खासदार स्थानिक क्षेत्र विकास निधीमधून बर्न वॉर्ड निर्मितीसाठी व्हेंटिलेटर, व्हेल्टीपेरा मॉनिटर, डिफीबलीलेटर, कॉट्स, बेड साईड लॉकर व इतर साहित्य खरेदीसाठी ३५ लाख २० हजार रुपये निधी आॅक्टोबर २०१५ मध्ये देण्याचे निश्चित केले होते. याचवेळी पालिकेच्या नवीन रुग्णालयामध्ये डायलेसिस मशिन, कॉट्स,आरओ प्लॉन्ट, पल्स आॅक्सीलेटरसाठी ६० लाख रुपयांचा निधी प्रस्तावित केला होता. स्वत: खासदार विचारे यासाठी पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करत होते. या कामांसाठी ४७ लाख ६० हजार रुपयांचा निधी पालिका प्रशासनाकडे देण्यात आला होता. पण प्रशासनाने निधीचा वापर करण्याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. परिणामी आर्थिक वर्षअखेरीस तो परत पाठविण्याची नामुष्की प्रशासनावर आली आहे. आरोग्यासारख्या संवेदनशील विभागासाठी आलेला निधी परत पाठविण्यात आल्यामुळे प्रशासन या विभागाचे कामकाज सुधारण्याकडे किती उदासीन आहे हेच स्पष्ट होत असल्याची टीका होवू लागली आहे. खासदारांनी दिलेला निधी परत पाठविला असताना दुसरीकडे ठेकेदार नियुक्त करून डायलेसिस सुविधा उपलब्ध करून देण्याचा घाट सुरू आहे. ऐरोली व नेरूळ रुग्णालयामध्ये डायलेसिस रुग्णांसाठी दहा बेड राखीव ठेवले आहेत. वर्षाला दोन्ही रुग्णालयामध्ये १८,७२० रुग्णांचे डायलेसिस गृहीत धरून व प्रत्येकासाठी ९२५ रुपये खर्च अपेक्षित धरून पालिकेने प्रस्ताव तयार केला आहे. प्रत्येक वर्षी यासाठी १ कोटी ७३ लाख १६ हजार रुपये खर्च अपेक्षित असून पाच वर्षांमध्ये ८ कोटी ६५ लाख ८० हजार रुपये खर्चास प्रशासकीय मंजुरी मिळावी असा प्रस्ताव मंगळवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत सादर करण्यात आला आहे. सीटी स्कॅनची यंत्रणाही बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. वर्षाला ४४०० रुग्णांचे सीटी स्कॅन गृहीत धरण्यात आले असून त्यासाठी वर्षाला ६४ लाख व पाच वर्षांसाठी ३ कोटी २२ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. आज प्रस्ताव सर्वसाधारण सभेतबाह्य यंत्रणेद्वारे सीटी स्कॅन व डायलेसिस करण्याचा प्रस्ताव १८ एप्रिलला होणाऱ्या सर्वसाधारण सभेमध्ये मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. तब्बल ११ कोटी ८८ लाख रुपये खर्चासाठी सर्वसाधारण सभेची मंजुरी मागितली जाणार आहे. प्रस्तावामध्ये अशाप्रकारे बाह्य यंत्रणेद्वारे सीटी स्कॅन व डायलेसिस कोणत्या रुग्णालयांमध्ये सुरू आहे, त्यांचे दर काय आहेत, यापूर्वी पालिका स्वत: डायलेसिस करत होती, ते का बंद करण्यात आले किंवा येणार आहे, याविषयी जाब विचारला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
डायलेसिससाठी ठेकेदार नियुक्त करणार
By admin | Published: April 18, 2017 6:50 AM