नामदेव मोरे, नवी मुंबईमुंबई - पुणे द्रुतगती महामार्गावर सोमवारी सायंकाळी झालेल्या अपघातामध्ये नेरूळमधील दोघांचा मृत्यू झाला, चार जण गंभीर जखमी झाले. वेळेत रूग्णवाहिका उपलब्ध झाली नसल्याने उपचारापूर्वीच तरूणांचा मृत्यू झाला. ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळेच अनेकांना जीव गमवावा लागत असल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. देशातील सर्वाधिक अपघात होणाऱ्या महामार्गामध्ये मुंबई - पुणे रोडचा समावेश होतो. याच मार्गावर अभिनेते आनंद अभ्यंकर व अक्षय पेंडसे यांचा मृत्यू झाला होता. मुंबईकडे येत असताना टायर फुटल्याने कार दुभाजक ओलांडून पुणेच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर गेली. तेथे ट्रकच्या धडकेमुळे दोन्ही अभिनेत्यांचा मृत्यू झाला. नेरूळमधील भीमाशंकर सोसायटीतील नगरसेवक रवींद्र इथापे यांचा मुलगा राहुल इथापे व त्याचे मित्र लग्नासाठी सांगलीला गेले होते. तेथून परत येत असताना भाताण बोगद्याजवळ कारचा टायर फुटला. दुभाजक पुरेशा उंचीचा नसल्याने कार पुणे बाजूच्या लेनवर गेल्याने इनोव्हाची जोरदार धडक बसली. यामध्ये प्रशांत पाटील व निखील सुद या दोघांचा मृत्यू झाला. राहुल इथापे, अमर वाणी, प्रतीक धुमाळ, सचिन चव्हाण, भीमा खराडे हे गंभीर जखमी झाले. यामधील खराडे याचेही निधन झाले आहे. अपघात झाल्यानंतर काही मिनिटामध्येच महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दिलीप घोडेकर घटनास्थळी पोहचले. त्यांनी इतर प्रवाशांच्या मदतीने रूग्णवाहिका बोलावली. परंतु इथापे यांच्या कारमधील सहाही जणांना गंभीर दुखापत झाली होती. इनोव्हा कारमधील दोन जण जखमी झाले होते. जवळपास अर्धा तासाने एक रूग्णवाहिका आली. त्यामध्ये दोघांना पाठविण्यात आले. यानंतर उर्वरित दोन रूग्णवाहिका येण्यास प्रत्येकी १५ मिनिटे व अर्धा तास वेळ गेला. यामुळे रूग्णालयात जाण्यापूर्वीच दोघांचा मृत्यू झाला.मुंबई - पुणे महामार्गावर अपघात झाल्यास तत्काळ रूग्णवाहिका पुरविण्याची जबाबदारी टोल वसुली करणाऱ्या ठेकेदाराची आहे. परंतु याठिकाणी जखमींना तत्काळ रूग्णालयात घेवून जाण्याची यंत्रणाच उपलब्ध नाही. वास्तविक महामार्गावरील अपघात हे गंभीर स्वरूपाचे असतात. जखमींना रूग्णालयात घेवून जाण्यासाठी अत्याधुनिक रूग्णवाहिकेची गरज आहे. रूग्णवाहिकेमध्ये तत्काळ उपचार सुरू करण्यासाठी डॉक्टर असणे आवश्यक आहे. परंतु सोमवारी झालेल्या अपघातामध्ये कोणत्याही सुविधा नसलेल्या रूग्णवाहिकेमधूनच रूग्णांना कळंबोली एमजीएम रूग्णालयात आणावे लागले. रूग्णवाहिकेमध्ये चालकाला सहकार्य करण्यासाठी दुसरा कर्मचारीही नव्हता. यामुळे चालकाची धावपळ झाली. वास्तविक महामार्गावर अपघात झाल्यानंतर नेहमीच अशाप्रकारचा अनुभव येत आहे. अनेक रूग्णांना फक्त वेळेत उपचार न मिळाल्याने जीव गमवावा लागत आहे.
ठेकेदाराची निष्काळजी अपघातग्रस्तांना भोवतेय
By admin | Published: March 23, 2016 2:28 AM