नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये ठेकेदारांची पिळवणूक होत आहे. बिल मिळविण्यासाठी १५ टेबलवर काहीतरी द्यावेच लागते, असा खळबळजनक आरोप शिवसेना नगरसेवक नामदेव भगत यांनी केला आहे. कल्याण व डोंबिवलीसह ठाणेमध्ये प्रशासनाच्या त्रासामुळे बिल्डरने आत्महत्या केल्याचे प्रकरण राज्यभर गाजत आहे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये ठेकेदारांची अडवणूक होत असल्याची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे. बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्येही याचे पडसाद उमटले. महापालिकेच्या बेलापूर भवन, आयुक्त निवास, महापौर निवास, सीबीडी, नेरूळ, वाशी व ऐरोली अग्निशमन केंद्र, गौरव म्हात्रे कला केंद्र, उपकर विभाग, मालमत्ता कर विभागाच्या इमारतीमधील हाऊसकिपिंगचे काम करण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी आला होता. या कामासाठी वर्षाला ६१ लाख ७५ हजार रुपये खर्च होणार आहेत. प्रशासनाने पाच वर्षांसाठी प्रशासकीय मंजुरी मिळावी असा प्रस्ताव मंजुरीसाठी मांडला होता. अनेक नगरसेवकांनी पाच वर्षांसाठी काम देण्यास विरोध केला.शिवसेना नगरसेवक नामदेव भगत यांनी महापालिका प्रशासनाच्या कार्यपध्दतीवर ताशेरे ओढले. महापालिकेमध्ये ठेकेदारांची पिळवणूक होत आहे. केलेल्या कामांची बिले मिळविण्यासाठी १५ टेबलवर काहीतरी द्यावेच लागते. काही दिले नाही तर बिल मिळत नाही. या आरोपामुळे खळबळ उडाली आहे.
प्रशासनाकडून ठेकेदारांची अडवणूक
By admin | Published: January 21, 2016 2:55 AM