सानुग्रह अनुदानावर महापालिकेत शिक्कामोर्तब, कंत्राटी कामगारांना १५ हजार रूपये मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 02:43 AM2017-09-20T02:43:06+5:302017-09-20T02:43:08+5:30
महानगरपालिका कर्मचा-यांच्या सानुग्रह अनुदानावर अखेर सर्वसाधारण सभेने शिक्कामोर्तब केले. कायम कर्मचा-यांना २० हजार रुपये व ठोक मानधनावरील कंत्राटी कामगारांना १५ हजार रुपये देण्यात येणार आहेत.
नवी मुंबई : महानगरपालिका कर्मचा-यांच्या सानुग्रह अनुदानावर अखेर सर्वसाधारण सभेने शिक्कामोर्तब केले. कायम कर्मचा-यांना २० हजार रुपये व ठोक मानधनावरील कंत्राटी कामगारांना १५ हजार रुपये देण्यात येणार आहेत. पालिकेच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच एवढी मोठी रक्कम सानुग्रह अनुदान म्हणून देण्यात येणार आहे.
दिवाळीपूर्वी सानुग्रह अनुदानाची रक्कम कर्मचाºयांना मिळावी, यासाठी प्रशासनाने १५ सप्टेंबरच्या सर्वसाधारण सभेमध्ये प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवला होता. कायम कर्मचाºयांना १७ हजार रुपये व कंत्राटी कामगारांना ९५०० रुपये प्रस्तावित केले होते. स्थायी समितीने यामध्ये वाढ करून कायम कर्मचाºयांना १९ हजार रुपये व कंत्राटी कामगारांना १२ हजार रुपये प्रस्तावित केले होते. हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेमध्ये मांडण्यात आला होता. सर्वसाधारण सभेने कायम कर्मचाºयांना एक हजार रुपये वाढवून त्यांची रक्कम २० हजार केली. ठोक मानधनावरील कर्मचाºयांना १२ वरून १५ हजार रुपये मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला. शिक्षण विभागातील सानुग्रह अनुदानापासून वंचित असलेल्या कर्मचाºयांनाही याचा लाभ देण्यात यावा, अशी सूचना सभागृह नेते जे. डी. सुतार यांनी या वेळी केली.
सर्वसाधारण सभा सानुग्रह अनुदानामध्ये किती वाढ करणार याकडे कर्मचाºयांचे लक्ष लागून राहिले होते. पालिकेचे कामकाज संपल्यानंतर कर्मचारी मोठ्या संख्येने प्रेक्षागॅलरीमध्ये एकत्रित जमले होते. सभेला उशीर झाल्याने प्रस्ताव मंजूर होणार की नाही, याविषयी शंका उपस्थित केली जात होती. अखेर शेवटच्या क्षणी सानुग्रह अनुदानाचा प्रस्ताव मंजूर करताच सर्वच कर्मचाºयांनी सुटकेचा श्वास सोडला. महापालिकेची स्थापना झाल्यानंतर प्रथमच कायम कर्मचाºयांना २० हजार व ठोक मानधनावरील कर्मचाºयांना १५ हजार रुपये देण्यात येणार असल्याने कर्मचाºयांनी समाधान व्यक्त केले.