घणसोलीतील स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान मोठे; माफीनामा लिहून दिला तरच सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2021 01:01 AM2021-01-26T01:01:00+5:302021-01-26T01:01:47+5:30
घणसोलीतील स्वातंत्र्य संग्राम चौकाचे २० मार्च १९९९ रोजी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक दत्ताजी ताम्हणे यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते.
अनंत पाटील
नवी मुंबई : ब्रिटिश राजवटीत ठाणे जिल्हा साष्टी तालुक्याचा भाग म्हणून संबोधला जात असे. आताच्या ठाणे शहराच्या पूर्वेस खाडी किनाऱ्यावर पोर्तुगीजांनी बांधलेला किल्ला असून त्या किल्ल्याचे रुपांतर आता ठाणे तुरुंगात झाले आहे. याच तुरुंगात ब्रिटिश सरकारने ज्वलंत क्रांतिकारकांना फाशीची शिक्षा दिली होती. असंख्य देशभक्तांना लोखंडी गजाआड डांबून ठेवले म्हणून हे ठाण्याचे कारागृह स्वातंत्र्य आंदोलनात महत्त्वाचे होते. घणसोली गावात स्वातंत्र्यसैनिकांच्या आठवणींना उजाळा देणारी “स्वातंत्र्यसंग्राम चौक” वास्तू आहे.
महादेव काळदाते,डॉ.देसाई,दत्तू वाळक्या, वाल्मिक कोतवाल,वकील दामले यांच्या नेतृत्वाखाली ३० जानेवारी १९३० रोजी ब्रिटिशांच्या विरोधात आंदोलनाला सुरुवात झाली. यात घणसोली येथील बामा म्हात्रे, सोमा कोळी, फकीर पाटील, राघो पाटील, कमला म्हात्रे, जोमा मढवी, पांडुरंग बोंद्रे, शंकरबुबा पाटील, रामा रानकर, वामन पाटील, सीताराम बामा, रघुनाथ पवार,नारायण मढवी, चाहु पाटील, हाल्या म्हात्रे, महादू पाटील, वाल्मिक पाटील, वाळक्या पाटील परशुराम पाटील आदींनी मिठाच्या सत्याग्रहात भाग घेतला. १३ एप्रिल १९३० रोजी सानपाडा येथील सोनखाडीतून मीठ घेऊन घोषणा देत सत्याग्रही ठाण्याच्या दिशेने जात असताना बोनकोडे येथे पोलिसांनी लाठीमार केला. त्यात गोठीवली गावच्या कान्हा म्हात्रे यांच्या पायाला दुखापत झाल्याने अपंगत्व आले. त्याच कालावधीत दिघा, ऐरोली, दिवा, रबाळे, तळवली, गोठीवली, घणसोली, कोपरखैरणे, बेलापूरपर्यंत बैठका घेऊन जनजागृती केली. १९४२ पर्यंत या सत्याग्रहींनी ब्रिटिशांची रेल्वे सेवा बंद होण्यासाठी रूळ काढण्याचे प्रकार केले, विजेचे खांब तोडणे,टेलिफोनच्या तारा कापून टाकणे याकामी जनजागृती केली. घणसोलीतील स्वातंत्र्य संग्राम चौकाचे २० मार्च १९९९ रोजी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक दत्ताजी ताम्हणे यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते.
माफीनामा लिहून दिला तरच सुटका
१ जानेवारी १९३१ रोजी विलेपार्ले येथील परिषदेत घणसोली छावणीत सत्याग्रहींनी स्वयंसेवक म्हणून काम केले. तेव्हा त्यांना पकडून अंधेरीच्या तुरुंगात डांबले. १६ फेब्रुवारी १९३२ मध्ये घणसोली गावात तिरंगा हातात घेऊन घोषणा दिल्याने ब्रिटिशांनी अनेकांना अटक करून ठाण्याच्या तुरुंगात टाकले. प्रत्येकाच्या घरातील भांडीकुंडी जप्त करून माफीनामा लिहून दिला तरच सुटका होण्याचे फर्मान काढले.