डेंग्यू, मलेरिया साथ नियंत्रणात
By admin | Published: November 18, 2015 01:21 AM2015-11-18T01:21:52+5:302015-11-18T01:21:52+5:30
शहरात सुरू झालेली डेंग्यू व मलेरियाची साथ नियंत्रणामध्ये येवू लागली आहे. पालिकेने आॅगस्टपासून तब्बल ३ लाख ३४ हजार घरांना भेट देवून ५ लाख डासउत्पत्ती स्थळे शोधून
नवी मुंबई : शहरात सुरू झालेली डेंग्यू व मलेरियाची साथ नियंत्रणामध्ये येवू लागली आहे. पालिकेने आॅगस्टपासून तब्बल ३ लाख ३४ हजार घरांना भेट देवून ५ लाख डासउत्पत्ती स्थळे शोधून काढली आहेत. जानेवारीपासून तब्बल १ लाख ४२ हजार रूग्णांची रक्ततपासणी केली आहे. व्यापक जनजागृती मोहीम व केलेल्या उपाययोजनांमुळे शहरातील तापाची साथ नियंत्रणात येवून शहरवासीयांना दिलासा मिळू लागला आहे.
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये पावसाळा सुरू झाल्यापासून डेंग्यू व मलेरियाची प्रचंड साथ सुरू झाली होती. तापाच्या साथीमुळे शहरातील सर्व रूग्णालये फुल्ल झाली होती. तापामुळे २५ पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. महापालिकेच्या आरोग्य विभागाविषयीही नाराजी निर्माण झाली होती. पालिकेने विशेष सर्वसाधारण सभा घेतली होती. पालिकेने एप्रिल व मे महिन्यामध्ये शहरातील २ लाख ८६ हजार घरांची पाहणी केली होती. आॅगस्टमध्ये पुन्हा ३ लाख ३४ हजार घरांची पाहणी करून ५ लाख २८ हजार डासउत्पत्तीस्थळे शोधून काढली होती. यामधील ३४८ ठिकाणी एनफिलीस, १०३८ ठिकाणी एडीस व २२ क्युलेक्स डासांच्या अळ्या सापडल्या होत्या. डेंग्यू व मलेरियाची साथ नियंत्रणात आणण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक असल्यामुळे पालिका प्रशासनाने जून महिन्यापासून शहरात २ लाख भित्तीपत्रके गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये लावली आहेत. १ लाख ७५ हजार हस्तपत्रकांचे वाटप केले आहे. शहरात तब्बल ९२ शिबिरे व प्रदर्शनांचे आयोजन केले होते. शहरात १३५ मोठे होर्डिंग उभारण्यात आले. प्रत्येक नागरिकापर्यंत पोहचता यावे यासाठी १० हजार थ्री फोल्ड बुकलेट, २० हजार स्टीकर्स वाटण्यात आली.
महापालिका प्रशासनाने साथ नियंत्रणात आणण्यासाठी लिंक वर्कर व अंगणवाडी सेविकांच्या ५२ प्रशिक्षण सभा घेतल्या होत्या. प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांच्या, सामाजिक संस्थांच्या २२० सभा घेवून जनजागृती करण्यात आली. शहरात ६८१४ ठिकाणी डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होणारी ठिकाणे आहेत. ८५० ठिकाणी गप्पी मासे सोडण्यात आले आहेत. महापालिका क्षेत्रामध्ये जानेवारीपासून तापाचे १ लाख ४२ हजार रूग्ण आढळून आले आहेत. यामधील १००६ संशयित डेंग्यूचे रूग्ण आहेत. एनएस१ चे ८५९, एलजीएमचे ७३ रूग्ण आढळून आले आहेत.
महापालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. दीपक परोपकारी यांनीही शहरात तापाची साथ नियंत्रणात आली असल्याचे स्पष्ट केले आहे.