नवी मुंबई : स्वाइन फ्लूने शेजारच्या मुंबई, ठाण्यात धुमाकूळ घातला आहे. नवी मुंबईत मात्र ही साथ पूर्णत: नियंत्रणात असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. विविध स्तरावर करण्यात आलेल्या सकारात्मक प्रयत्नांमुळे यावर्षी नवी मुंबईत स्वाइनचा फारसा प्रभाव जाणवला नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मुंबईत स्वाइनमुळे आतापर्यंत ४२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर स्वाइनची लागण झालेले शेकडो रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. मुंबईच्या तुलनेत नवी मुंबईत मात्र परिस्थिती नियंत्रणात असल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. जानेवारी ते आॅगस्ट या आठ महिन्यांत स्वाइनच्या ९६,0६८ संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १३७ जणांना स्वाइनची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यातील सात रुग्णांचा मृत्यू झाला आहे. स्वाइनमुळे मृत्यू झालेले हे सर्व रुग्ण रायगड जिल्ह्यातील उरण, पनवेल, कामोठे या शहरातून उपचारासाठी नवी मुंबईत आले होते. (प्रतिनिधी)1)स्वाइनचा अटकाव करण्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध स्तरावर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. वाशी येथील महापालिकेच्या प्रथम संदर्भ रुग्णालय आणि नेरूळच्या डी.वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये स्वाइनच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी विशेष वॉर्ड तयार करण्यात आले आहेत.2)त्याचप्रमाणे स्वाइनच्या रुग्णांचे निदान करण्यासाठी शहरात २८ ठिकाणी तपासणी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. त्याशिवाय विविध माध्यमांद्वारे मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे. या सर्वांचा सकारात्मक परिणाम म्हणून स्वाइन फ्लूची साथ नियंत्रणात ठेवण्यात यश आल्याचे महापालिकेच्या साथ रोग नियंत्रण विभागाचे प्रमुख डॉ. कैलाश गायकवाड यांनी सांगितले.
स्वाइनची साथ नियंत्रणात
By admin | Published: August 26, 2015 11:02 PM