पीआयएफच्या वादग्रस्त चिठ्ठीने नवीन पनवेलमध्ये खळबळ
By वैभव गायकर | Published: June 24, 2023 06:06 PM2023-06-24T18:06:28+5:302023-06-24T18:07:56+5:30
या प्रकारामुळे या सोसायटी मधील रहिवासी भीतीच्या सावटाखाली आहेत.
पनवेल : नवी पनवेल मधील सेक्टर 19 मधील नील आंगण इमारतीमध्ये पीएफआय जिंदाबाद व दोन सुतळी बॉम्ब लावून दहशत पसरविण्याचा प्रयत्न समोर आला आहे. दि.24 रोजी हा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे या सोसायटी मधील रहिवासी भीतीच्या सावटाखाली आहेत.
घटनेची माहिती मिळताच खांदेश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.या सोसायटीला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.सोसायटी मध्ये दर्शनीय भागात पी एफ आय जिंदाबाद अशा स्वरूपाच्या चिठ्ठ्या ठेवण्यात आल्या आहेत.घटनेची माहितीसाठी पनवेलचे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी देखील बैठकीत असल्याचे सांगत या घटनेबाबत बोलणे टाळले.दहशतवादी कारवायांमध्ये गुंतल्याचा ठपका असलेली पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर केंद्र सरकारने पाच वर्षांची बंदी घातली आहे.
केंद्र सरकारने याबाबतचा अध्यादेश जारी केला आहे. तपास यंत्रणांच्या शिफारसीवर गृहमंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. मागील काही दिवसांत केंद्रीय तपास यंत्रणांनी पीएफआयवर जोरदार कारवाई सुरू केली होती. राष्ट्रीय तपास यंत्रणा,ईडी यांच्यासह विविध राज्यातील तपास यंत्रणांनी पीएफआयच्या कार्यालयांवर छापे मारले होते .पनवेल मधून देखील याप्रकरणी काहींना अटक झाली होती.