पनवेल : खारघर शहराला दारूमुक्त करण्याचा लढा जवळपास एक दशकापासून सुरू आहे. याकरिता स्थापन झालेली संघर्ष समिती ही सर्वपक्षीय नेते, सामाजिक संघटना आदींच्या सहकार्याने प्रशासनासोबत लढा देत आहे. मात्र, खारघर शहरातील हॉटेल रॉयल ट्युलीपने दर्शनीय भागात खारघरचे नामकरण ‘बारघर’ केल्याने खारघरवासीयांमध्ये संताप निर्माण झाला होता. या संदर्भात सोमवारी येथील सामाजिक संघटना, राजकीय पदाधिकाऱ्यांनी हॉटेल प्रशासनाची भेट घेऊन वादग्रस्त नाव काढून टाकण्याची सूचना केल्यांनतर हे नाव झाकण्यात आले.खारघर शहराला दारूमुक्त करण्यासाठी तत्कालीन ग्रामपंचायतीने देखील ठराव केला होता. यासंदर्भात अनेक वेळा मोर्चे, निदर्शने करण्यात आली होती. ज्या हॉटेल रॉयल ट्युलिपने खारघरचे बारघर असे नामांतर केले, त्या हॉटेलला मद्यविक्रीचा परवाना देण्यात आल्यानंतर खारघर शहरातील नागरिकांनी पोलीस ठाण्यावर भव्य मोर्चा काढला होता. एकीकडे रहिवासी खारघरला दारूमुक्त (नो लीकर झोन) करण्यासाठी प्रयत्न सुरु करीत आहेत तर दुसरीकडे हॉटेल रॉयल ट्युलिपच्या माध्यमातून बारघरचे बोर्ड लावण्यात आल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.खारघरची वाटचाल शैक्षणिक प्रगतीकडे होत असताना शहराला बदनाम करण्याचे कारस्थान हॉटेल रॉयल ट्युलीपच्या व्यवस्थापनामार्फत सुरु आहे. यासंदर्भात शहरातील संघर्ष समिती देखील आक्रमक झाली आहे. केवळ नाव नाही तर हे दारूविक्री करणारे हॉटेलच बंद करण्याचा आमचा उद्देश आहे. यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली आहे. हॉटेल व्यवस्थापनाकडून आॅनलाईन जाहिरात करूनही खारघरची बदनामी केली जात आहे. कुठेतरी हे थांबायला हवे, अशी भावना संघर्ष समितीचे संजय जाधव यांनी व्यक्त केली आहे.संबंधित प्रकाराचे तीव्र पडसाद उमटल्याने सेनेच्या शिष्टमंडळाने पोलिसांनी यासंदर्भात निवेदन देऊन बोर्ड हटविण्याची मागणी केली. प्रभाग अ चे सभापती शत्रुघ्न काकडे यांनी, यासंदर्भात हॉटेल व्यवस्थापनाची भेट घेऊन वादग्रस्त बोर्ड हटविण्यास सांगितले. अखेर बोर्ड तात्पुरस्त्या स्वरुपात झाकण्यात आला.हॉटेल प्रशासनाकडून कोट्यवधींची जागा हडपहॉटेलला लागूनच सिडकोमार्फत पाथवे उभारला आहे. संबंधित हॉटेल मालकांनी ही जागा हडप केली आहे. या जागेखाली भूमिगत पार्किंग उभारले आहे. सध्याच्या बाजारभावाप्रमाणे ही जागा कोटीच्या घरात असल्याने सिडकोने संबंधित जागा हडप केल्याप्रकरणी कारवाईची मागणी संघर्ष समितीचे अध्यक्ष संजय जाधव यांनी केली.बारघर वादग्रस्त बोर्डमुळे खारघर शहराची मोठी बदमानी करण्यात आली. नागरिकांमध्ये जनक्षोभ निर्माण झाल्याची कल्पना हॉटेल रॉयल ट्यूलिप व्यवस्थापनाची भेट घेऊन दिली. त्यांनी हे बोर्ड तात्पुरते झाकले आहे.- शत्रुघ्न काकडे,सभापती, प्रभाग अ समिती, पनवेल महापालिका
नागरिकांच्या उद्रेकानंतर हॉटेलचे वादग्रस्त नाव झाकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2019 5:11 AM