कळंबोली : पनवेल रेल्वेस्थानक परिसरात थांब्यावरून रिक्षाचालकांचा मोठा वाद सुरू आहे. बुधवारी पुन्हा तंटा झाल्याने दोन तास रिक्षा बंद ठेवण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागले. वाहतूक आणि पनवेल शहर पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर ही सेवा पुन्हा सुरू करण्यात आली. मात्र, वारंवार होणाऱ्या वादावर कायमस्वरूपी पडदा पडेल केव्हा असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
पनवेल, नवीन पनवेल, कळंबोली, कामोठे, खारघर या परिसरात दहा हजारांपेक्षा जास्त रिक्षा व्यवसाय करतात. बऱ्याच ठिकाणी रिक्षांना नाकाबंदी केली जाते म्हणजे इतर रिक्षा त्या ठिकाणी थांबू दिल्या जात नाहीत. हीच परिस्थिती पनवेल रेल्वेस्थानकावर आहे. पनवेल बाजूकडील रिक्षा थांब्यावरून इतरांना प्रवासी नेण्यास मज्जाव केला जातो. त्याचबरोबर येथे स्थानिक आणि बाहेरचा असाही वाद आहे. परंतु एमएमआरडीएच्या क्षेत्रात नियमानुसार कुठेही व्यवसाय करण्याची मुभा असताना येथे आम्हाला थांबू का दिले जात नाही असा प्रश्न दुसरे रिक्षाचालक करीत आहेत. तर येथे व्यवसाय करणारे रिक्षाचालक आम्ही स्थानिक असल्याचा मुद्दा पुढे करीत आहेत. यामुळे पनवेल रेल्वेस्थानकावर वारंवार रिक्षाचालकांमध्ये वादविवाद होतात.
बुधवारी सुद्धा अशाच प्रकारे तंटा झाल्याने दोन गटांत बाचाबाची झाली. त्यामुळे १0 ते १२ या कालावधीत पनवेल रेल्वेस्थानकावरील रिक्षांनी प्रवासी सेवा बंद केली. आरटीओ व वाहतूक पोलिसांकडून ठोस भूमिका घेतली जात नसल्याने वादंग मिटत नसल्याचे काही रिक्षाचालकांचे म्हणणे आहे. पनवेल रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर आणखी एक रिक्षा थांबा सुरू करण्यात आल्याने आतमधील आणि बाहेरवाले असे गट तयार झाले आहेत. एकीकडे रिक्षांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे व्यवसायावर परिणाम झाला आहे आणि दुसरीकडे वाद तंटे निर्माण झाल्याने प्रामाणिक रिक्षाचालकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.एनएमएमटी बसकडे प्रवाशांची धावपनवेल रेल्वे स्थानक परिसरातून एनएमएमटी बस सेवा सुरू आहे. मात्र, प्रवासी शेअर रिक्षांना पसंती देत इच्छित स्थळ गाठतात. बुधवारी रिक्षा बंद असल्याने प्रवाशांनी एनएमएमटी बसमधून प्रवास केला. त्यामुळे बसमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याचे पाहावयास मिळाले.
पनवेल परिसरात बºयाच वेळा रिक्षा थांब्यावरून वाद होतात. तीन महिन्यांपूर्वी रिक्षा चालकांशी समन्वय साधून वाद मिटवण्यात आला होता. त्यामुळे प्रवाशांना त्रास होतो ही वस्तुस्थिती आहे. गुरुवारी रेल्वे प्रशासन, रिक्षा चालक, आरटीओ यांची संयुक्त बैठक याबाबत तोडगा काढण्यात येईल.- अभिजित मोहिते,प्रभारी अधिकारी,पनवेल वाहतूक शाखा