कळंबोली येथील शाळेत गंध, टिकलीस मनाई
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2020 11:57 PM2020-02-27T23:57:38+5:302020-02-27T23:57:58+5:30
विद्यार्थ्यांना सक्ती न करण्याची मागणी
कळंबोली : कळंबोलीतील कारमेल कॉन्व्हेंट शाळेमध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना गंध, टिकली, तसेच नेलपेंट लावण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे शाळा व्यवस्थापनाविरोधात नाराजी व्यक्त होत असल्याने शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मुख्याध्यापिकेची भेट घेऊन यासंदर्भात निवेदन सादर केले. अशा प्रकारे सक्ती न करण्याची मागणी या वेळी करण्यात आली आहे.
कारमेल कॉन्व्हेंट शाळेतील विद्यार्थ्यांवर अनेक निर्बंध लादले आहेत. गंध, टिकली, नेलपेंट, हातावर मेहंदी लावण्यास मनाई करण्यात येत आहे. तसेच कोणत्याही प्रकारचे धागे-दोरेही बांधू दिले जात नाहीत. यासंदर्भात शिवसेनेचे महानगरप्रमुख रामदास शेवाळे, विधानसभा संघटक दीपक निकम, आत्माराम गावंड, प्रकाश चांदिवडे यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका एम. सुश्मिता यांची भेट घेत निवेदन दिले. एखाद्याच्या संस्कृतीवर घाला घालण्याचा अधिकार व्यक्ती, संस्था किंवा शाळेला नाही. इतरांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणाºया धोरणांचा निवेदनात कडक शब्दात निषेध व्यक्त केला.
आपल्या धर्माबरोबरच इतर धर्मांबद्दलही आदर राखणे हे लोकशाहीला अभिप्रेत आहे. कारमेल कॉन्व्हेंट शाळेने विद्यार्थ्यांची संस्कृती जतन करण्याच्या अधिकारावर गदा आणणे चुकीचे आहे.
- रामदास शेवाळे,
पनवेल महानगरप्रमुख, शिवसेना
शाळेचे नियम ठरलेले आहेत. त्याचे पालन बंधनकारक आहे. हा एक शिस्तीचा भाग आहे. बाहेर किंवा घरी विद्यार्थ्यांनी त्या गोष्टी जरूर कराव्यात; परंतु शाळेत नियमांचे पालन करणे क्रमप्राप्त आहे. शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आम्हाला निवेदन दिले आहे, त्याप्रमाणे व्यवस्थापनाला कळविण्यात येईल.
- एम. सुश्मिता, मुख्याध्यापिका