नवी मुंबई : अप सायकल आर्ट टॉयलेट बसेस मंगळवारी शहरवासीयांच्या सेवेत दाखल झाल्या. टाकाऊतून टिकाऊ ही संकल्पना राबवून एनएमएमटीच्या वापरात नसलेल्या दोन बसेसचे मोबाइल टॉयलेटमध्ये रूपांतर सारा प्लास्ट कंपनीने करून दिले असून ग्लोबल ग्रीन इनोव्हेटर्ने रंगरंगोटी केली आहे.
दाेन्ही बसेसच्या पुढील भागात महिलांसाठी व मागील भागात पुरुषांकरिता स्वच्छतागृहाची व्यवस्था आहे. तसेच स्वतंत्र दरवाजे आहेत. वॉश बेसिन, स्वतंत्र चेंजिंग रूम असून टपावर पाण्याची टाकी बसविली आहे. यामध्ये जसपाल सिंग नोएल, बिनॉय के, निखिल एम, संकल्प पाटील, सुधीर शेडगे, वैभग घाग या कलाकारांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. दोन्ही मोबाइल टॉयलेट नागरिकांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत. लोकार्पण प्रसंगी अतिरिक्त आयुक्त संजय काकडे, दादासाहेब चाबूकस्वार, घनकचरा विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, उपआयुक्त क्रांती पाटील, प्रल्हाद खोसे, वसंत पडघन व इतर मान्यवर उपस्थित होते.