झेरॉक्सची प्रत महागणार; १0 सप्टेंबरपासून अंमलबजावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 04:26 AM2018-09-03T04:26:04+5:302018-09-03T04:26:13+5:30
विविध कारणांमुळे झेरॉक्सचा व्यवसाय अडचणीत सापडला आहे. समाज माध्यमाच्या वाढत्या प्रभावामुळे झेरॉक्सचे महत्त्व कमी होत चालले आहे. त्याचा फटका झेरॉक्स व्यावसायिकांना बसला आहे.
नवी मुंबई : विविध कारणांमुळे झेरॉक्सचा व्यवसाय अडचणीत सापडला आहे. समाज माध्यमाच्या वाढत्या प्रभावामुळे झेरॉक्सचे महत्त्व कमी होत चालले आहे. त्याचा फटका झेरॉक्स व्यावसायिकांना बसला आहे. त्यामुळे सरासरी व्यवसायातील ही तूट भरून काढण्यासाठी झेरॉक्स अॅण्ड प्रिन्ट असोसिएशनने १0 सप्टेंबरपासून झेरॉक्सच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
नवी मुंबईतील दिघा ते पनवेलपर्यंतच्या क्षेत्रात झेरॉक्सचे जवळपास पाचशे व्यावसायिक आहेत. मागील काही वर्षात कागदांच्या वाढलेल्या किमती, झेरोक्स मशिनचे वाढलेले दर, कामगारांची मजुरी आदीचा फटका या व्यवसायाला बसला आहे. सोशल मीडियामुळे तर हा व्यवसाय धोक्यात आला आहे. सध्या दर्जानुसार झेरॉक्सच्या एका कॉपीला ५0 पैसे ते दीड रुपयापर्यंत आकारणी केली जाते. विशेष म्हणजे दर आकारणीवर कोणतेही नियमन नसल्याने वेगवेगळ्या दुकानात वेगवेगळे दर आकारले जातात. दर आकारणीत समानता यावी, यादृष्टीने असोसिएशनने सकारात्मक पाऊल उचलले आहे. त्याचाच एक भाग म्हणून गेल्या आठवड्यात वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात असोसिएशनची एक बैठक पार पडली. या बैठकीला पाचशेपेक्षा अधिक व्यावसायिक उपस्थित होते. सुप्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक बच्चुभाई आणि ज्येष्ठ पत्रकार मनोज जालनावाला हे यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. मुंबईत अनेक भागात झेरॉक्सचे दर एकसमान आहेत.
मात्र नवी मुंबईत यात कमालीची विषमता असल्याचे दिसून येते. त्यामुळे त्यात समानता आणणे गरजेचे असल्याचे मत बच्चुभाई पटेल यांनी व्यक्त केले.