कोरोना आयलाय, कसा साजरा होणार हावलूबाय?; आगरी कोळ्यांना प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 12:54 AM2021-03-24T00:54:12+5:302021-03-24T00:54:35+5:30
ग्रामपंचायत राजवटीपासून आताही आधुनिक शहराकडे वाटचाल करीत असलेल्या नवी मुंबईत काही गावठाणात पोलीस पाटीलकीला सर्वाधिक गावकीचा प्रमुख म्हणून मान दिला जातो.
अनंत पाटील
नवी मुंबई : 'आमचे दाराशी हाय शिमगा, सण शिमग्याचा आयलाय गो आमचे गावान.. आमचे दाराशी हाय शिमगा' हे शाहीर रमेश नाखवा यांच्या आवाजातील गाणे आगरी कोळ्यांच्या होळीच्या सणाला वाजल्याशिवाय होळीचा सण साजरा होत नाही.
“हावलूबाय” म्हणजेच होळीवर रचलेली पारंपरिक गाणी तसेच महिलांच्या उत्तर, दक्षिण दिशेच्या दोन रांगेत होणारे 'नागेली नागेली...' ही गाणी आता हुळूहळू ठाणे, रायगड, नवी मुंबई आणि मुंबईच्या कोळीवाड्यात प्रत्येकाच्या कानावर पडत असतीलच. होळी... म्हणजे होलिकोत्सव. कोळी-आगरी बांधवांसाठी हा दिवाळीइतकाच महत्त्वाचा सण. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने यावर्षीच्या शिमग्याच्या सणावर कोरोनाचे सावट असल्यामुळे महिलांमध्ये नाराजी असल्याचे पाहावयास मिळते.
ग्रामपंचायत राजवटीपासून आताही आधुनिक शहराकडे वाटचाल करीत असलेल्या नवी मुंबईत काही गावठाणात पोलीस पाटीलकीला सर्वाधिक गावकीचा प्रमुख म्हणून मान दिला जातो. मुंबईच्या कोळीवाड्यात तर गावच्या पाटलाच्या हातूनच होळी पेटवून आनंदोत्सव साजरा करण्याची अनेक वर्षांची परंपरा आजही कायम आहे. गेल्या वर्षी ९ मार्च रोजी होळीचा सण मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. त्यानंतर २३ मार्च रोजी लॉकडाऊन करण्यात आले. मात्र, यंदा सामाजिक अंतर राखून, मास्कचा वापर करून महिला मोजक्याच संख्येने होळी देवतेचे पूजन करणार असल्याचा निर्णय मुंबई, रायगड, नवी मुंबई आणि पालघरच्या काही कोळीवाड्यातील लोकांनी घेतलेला आहे. दिवाळे कोळीवाड्यात होळीच्या सणाला नऊ दिवस अगोदरपासून सुरुवात होत असे. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमांचे पालन करूनच होळी आणि रंगपंचमीचा सण साजरा होणार आहे.
जावई बापू सन्मानाचा सोहळाही झाला रद्द
कोपरखैरणेत ‘एक गाव एक होळीची’ परंपरा १०० वर्षांपासून कायम आहे. गावात होळीच्या आधी ज्या मुलींची नवीन लग्न झाले असेल, त्या नव दाम्पत्याला मान देत जावईबापूंचा जाहीर सत्कार केला जातो. कोरोनामुळे यंदाचा सन्मान सोहळा रद्द करून तो पुढच्या वर्षी होणार असल्याचे कोपरखैरणे ग्रामविकास मंडळाने सांगितले.