कोरोना नियंत्रणात वॉररूम ठरतेय दुवा; सहा लाख नागरिकांची माहिती संकलित
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2020 12:17 AM2020-09-19T00:17:31+5:302020-09-19T00:18:00+5:30
प्रतिदिन किमान पाच हजार नागरिकांशी संवाद साधला जात असून, आतापर्यंत सहा लाखांपेक्षा जास्त नागरिकांची माहिती या केंद्राच्या माध्यमातून संकलित करण्यात आली आहे.
- नामदेव मोरे
नवी मुंबई : कोरोना नियंत्रणासाठी महानगरपालिकेच्या अभियानामध्ये वॉररूम महत्त्वाचा दुवा ठरत आहे. सर्व प्रकारची माहिती संकलन व सादरीकरणाचे काम या ठिकाणी होत आहे. प्रतिदिन किमान पाच हजार नागरिकांशी संवाद साधला जात असून, आतापर्यंत सहा लाखांपेक्षा जास्त नागरिकांची माहिती या केंद्राच्या माध्यमातून संकलित करण्यात आली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेने ब्रेक द चेन अभियान प्रभावीपणे राबविण्यास सुरुवात केली आहे. चाचण्यांचे प्रमाण वाढविणे, पॉझिटिव्ह रुग्ण शोधणे व वेळेत उपचार मिळवून देण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. या अभियानाला गती देण्यासाठी आयुक्त अभिजीत बांगर यांनी मनपा मुख्यालयात वॉररूम तयार केली आहे. आयटी इंजिनीअर व त्यांच्या सोबतीला जवळपास २० जणांची टीम या ठिकाणी प्रतिदिन १२ ते १५ तास काम करत आहे. वॉररूमची संकल्पना यशस्वी ठरत आहे. सर्व विभागांशी समन्वय साधण्यामध्ये दुवा म्हणून काम केले जात आहे. सकाळी ८ वाजता कोरोना रुग्णांची यादी प्राप्त झाल्यानंतर त्या यादीचे नागरी आरोग्य केंद्रनिहाय विभागणी करून संबंधित केंद्रांना यादी पाठविणे, रुग्णांशी संपर्क साधून त्यांच्यावर उपचार करण्यापासून त्यांच्या जवळच्या संपर्कातील नागरिकांची यादी तयार करून, त्यांच्याशी समन्वय साधण्यापर्यंतचे काम वॉररूममधून केले जात आहे. कोरोनाशी संबंधित सर्व प्रकारचे अहवालही बनविण्यात येत आहे. मृत्युदर, रुग्णवाढ, कोरोनामुक्त होणाऱ्यांचे सरासरी प्रमाण, नागरी आरोग्य केंद्रनिहाय तपशील यांची नोंद ठेवण्याचे कामही केले जात आहे.
वॉररूममध्ये कॉल सेंटरही तयार करण्यात आले आहे. येथून प्रतिदिन कोरोना रुग्ण, त्यांच्या संपर्कातील नागरिक, त्यांना मिळणाºया सुविधा, सहव्याधी (कोमॉर्बिड) नागरिकांशीही संवाध साधला जात आहे. जवळपास प्रतिदिन पाच हजार नागरिकांशी या कॉल सेंटरमधून संपर्क केला जात आहे. शहरातील सर्व कोरोना रुग्ण, क्वारंटाइन नागरिक व रुग्णाच्या जवळच्या संपर्कातील व्यक्तीचा तपशीलही नोंद करून घेतला जात आहे. शहरात प्रत्येक रुग्णाच्या संपर्कातील २० ते २२ नागरिकांचा तपशील संकलित करून ठेवला जात आहे. याशिवाय आरटीपीसीआर व अँटिजन चाचणी केलेल्यांचा तपशीलही नोंद केला जात आहे. वॉररूमच्या माध्यमातून सहा लाखांपेक्षा जास्त नागरिकांचा तपशील संकलित करण्यात पालिकेला यश आले आहे. ही सर्व माहिती अत्याधुनिक तंत्राच्या साहाय्याने संगणकात नोंद ठेवली जात असल्यामुळे त्याचा उपयोग कोरोना नियंत्रणासाठी व भविष्यातही आरोग्याविषयी मदतीसाठी होणार आहे.
प्रतिदिन १२ ते १५ तास काम
महानगरपालिकेच्या वॉररूमचे काम सकाळी ८ वाजता सुरू होते. रात्री ८ ते १० वाजेपर्यंत या ठिकाणी कोरोनाविषयी माहिती संकलन, माहितीचे वर्गीकरण, सादरीकरण, नागरिकांशी संवाद साधण्याची कामे केली जात आहेत. जवळपास २२ कर्मचारी अविश्रांतपणे काम करत आहेत. आठवड्यातून एकही दिवस सुट्टी न घेता अव्याहतपणे हे काम सुरू आहे.
कोरोना नियंत्रणासाठी सर्व विभागाशी व नागरिकांशीही संवाद साधून समन्वयाचे काम करण्यासाठी वॉररूम तयार करण्यात आली आहे. सकाळी ८ पासून रात्री उशिरापर्यंत माहिती संकलन, समन्वय व नागरिकांशी संवाद साधण्याचे काम या माध्यमातून केले जात आहे.
- अभिजीत बांगर, आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका