- नामदेव मोरे
नवी मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महानगरपालिकेने केलेल्या आवाहनाला झोपडपट्टीमधील नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यामुळेच सुनियोजित वसाहतींपेक्षा झोपडपट्टी परिसरात कोरोना नियंत्रणात यश आले आहे. चिंचपाडा, कातकरीपाडासह सहा नागरी आरोग्य केंद्रांच्या परिसराची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली असून, झोपडपट्टी परिसरातील कामगिरीचे सर्वत्र कौतुक होऊ लागले आहे.नवी मुंबईमध्ये १३ मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. तुर्भेसह इतर झोपडपट्ट्यांमध्येही रुग्णसंख्या झपाट्याने वाढली. प्रादुर्भाव रोखायचा कसा, असा प्रश्न महानगरपालिकेच्या आरोग्य विभागासमोर होता. पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ व नंतर आलेले आयुक्त अभिजीत बांगर यांनी ही जबाबदारी नागरी आरेाग्य केंद्रांवर सोपविली. या केंद्रांमधील आरोग्य अधिकारी व इतर सर्व कर्मचाऱ्यांनी सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन जनजागृती सुरु केली. प्रत्येक घरामध्ये व घरातील प्रत्येक सदस्यापर्यंत जनजागृती केली. नियमांचे पालन केले, तर कोरोना नियंत्रणात ठेवता येईल, हे प्रत्येक नागरिकाच्या मनावर बिंबविले. आवाहन करून जे ऐकत नाहीत, त्यांच्यावर कारवाई सुरु केली. यामुळे कोरोना नियंत्रणात येण्यास सुरुवात झाली. सुरुवातीच्या काळात सर्वात जास्त कोरोना रुग्ण असलेल्या झोपडपट्टीमधील रुग्णसंख्या आटोक्यात येण्यास सुरुवात झाली.झोपडपट्टी परिसरात डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोरोना रुग्णांची संख्या अत्यंत कमी झाली आहे. चिंचपाडामध्ये सर्वात कमी २ रुग्ण आहेत. कातकरीपाडा व इंदिरानगर परिसरात प्रत्येकी ४ रुग्ण शिल्लक आहत. सर्वात दाट लोकसंख्या असलेल्या तुर्भे परिसरातही हा आकडा ११ वर आला आहे. चिंचपाडामध्ये रुग्ण बरे हेण्याचे प्रमाण तब्बल ९७ टक्क्यांपेक्षा जास्त झाले आहे. सुरुवातीच्या काळात झोपडपट्टीमुळे शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढेल, असे बोलले जात होते, परंतु नागरी आरोग्य केंद्रांनी केलेल्या उपाययोजना व नागरिकांनी केलेले सहकार्य, यामुळे आता झोपडपट्टीमधील कोरोनामुक्तीचा पॅटर्न सुनियोजित परिसरात राबविण्याची गरज निर्माण झाली आहे.
डॉक्टरांची भूमिका ठरली आहे महत्त्वाची - झोपडपट्टी परिसरात कोरोना काळात परिश्रम घेणारे डॉक्टर व त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक होत आहे. कातकरी पाडा येथे सुरुवातीला भावना बनसोडे व अपर्णा मालवणकर यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम केले.- दिघामधील डॉ.सुरेश कुंभारे, चिंचपाडा येथील डॉ.सुषमा सारुक्ते, तुर्भे येथील डॉ. कैलास गायकवाड, इलठाणपाडा येथील मिलिंद वसावे, इंदिरानगरमधील मैथीली शिंदे व आता कैलास गायकवाड यांची भूमिका महत्वाची होती.
नियमांचे काटेकोर पालननागरी आरोग्य केंद्रांमधील अधिकाऱ्यांनी लोकांना नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले. कोणतीही लक्षणे दिसल्यानंतर तत्काळ चाचणी करण्याचे आवाहन केले. कोरोना झालेल्या रुग्णाच्या संपर्कातील २० ते २५ जणांशी संपर्क साधून त्यांची तपासणी व मार्गदर्शन करण्यास प्राधान्य देण्यात आले.