नवी मुंबईत कोरोना वाढला, सॅनिटायझरचा वापर कमी, शहरातील नागरिक बेफिकीर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 09:11 AM2021-03-17T09:11:30+5:302021-03-17T09:11:56+5:30
नवी मुंबई शहरात आटोक्यात आलेला कोरोना पुन्हा वाढू लागला आहे. परंतु स्वच्छतेच्या दृष्टीने वापरण्यात येणाऱ्या सॅनिटायझरचा वापर मात्र कमी झाला आहे. गेल्यावर्षी कोरोनाला सुरुवात झाली त्यावेळी या आजाराच्या उपचाराविषयी माहिती नव्हती.
योगेश पिंगळे -
नवी मुंबई : शहरातील नागरिकांची बेफिकिरी वाढल्याने कोरोनाबाधित रुग्णांमध्ये पुन्हा वाढ होऊ लागली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने वापरण्यात येणाऱ्या सॅनिटायझरची मागणी गेल्यावर्षी ८० ते ८५ टक्क्यांवर पोहचली होती परंतु विविध कारणांमुळे ही विक्री देखील १० ते १५ टक्क्यांवर आली आहे.
नवी मुंबई शहरात आटोक्यात आलेला कोरोना पुन्हा वाढू लागला आहे. परंतु स्वच्छतेच्या दृष्टीने वापरण्यात येणाऱ्या सॅनिटायझरचा वापर मात्र कमी झाला आहे. गेल्यावर्षी कोरोनाला सुरुवात झाली त्यावेळी या आजाराच्या उपचाराविषयी माहिती नव्हती. त्यामुळे सॅनिटायझरने हातांची स्वच्छता केल्यास सुरक्षित राहिले जाऊ शकते अशी नागरिकांची समजूत झाली होती. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती सॅनिटायझरचा वापर करू लागला होता. सॅनिटायझरच्या वाढलेल्या मागणीमुळे बाजारात अनेक ठिकाणी सॅनिटायझरची कमतरता भासू लागली होती. त्यामुळे कंपन्यांनी सॅनिटायझरचे दर देखील वाढविले होते. नागरिकांची आर्थिक लूट होत असल्याने शासनाच्या सूचनेनुसार दर निम्मे करण्यात आले होते.
याकाळात शासन, विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये स्वच्छतेची जनजागृती करताना सॅनिटायझर किंवा साबणाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात येत होते. त्यानंतर काही प्रमाणात सॅनिटायझरची मागणी घटली. कोरोनाकाळात कामानिमित्त घराबाहेर पडणारे नागरिक स्वतःकडे सॅनिटायझर बाळगत होते परंतु आता अनेक नागरिक कोरोनाला गांभीर्याने घेत नाहीत. तसेच सुरक्षा नियमांचे पालन करत नाहीत.
सॅनिटायझरची विक्री १५ टक्क्यांवर
कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात हातांची स्वच्छता करण्यासाठी सॅनिटायझरला प्राधान्य दिले जात होते. सॅनिटायझरची मागणी वाढल्याने अनेक कंपन्यांनी बाजारात विविध सुगंध, रंगांचे सॅनिटायझर विक्रीसाठी आणले होते. सुरुवातीला यांचे दर देखील जास्त होते. तरी देखील नागरिक सॅनिटायझर खरेदी करत होते. परंतु आता नागरिक कोरोनाची भीती नसल्यासारखे वागत असून पूर्वीप्रमाणे नियमाचे आणि स्वच्छतेचे पालन करत नाहीत. त्यामुळे सॅनिटायझरचा वापर देखील कमी झाला असून पूर्वीच्या तुलनेत सॅनिटायझरची विक्री सुमारे १५ टक्क्यांवर आली आहे.
कोरोनाच्या सुरुवातीला सॅनिटायझर फक्त मेडिकल स्टोअर्समध्ये उपलब्ध होते. आता सर्वच दुकानांमध्ये विक्री होत आहे. गेल्यावर्षी सॅनिटायझरला प्रचंड प्रमाणात मागणी होती. परंतु कोरोना अद्याप पूर्णपणे संपलेला नसताना काही नागरिक कोरोनाला गांभीर्याने घेत नाहीत, अनेक नागरिकांमध्ये बेफिकिरी वाढली आहे. अनेकांना सॅनिटायझर परवडत नसल्याने साबण वापरत आहेत. अशा विविध कारणांमुळे पूर्वीच्या तुलनेत सॅनिटायझरच्या विक्रीवर परिणाम झाला आहे.
- राकेश नलावडे,
नवी मुंबई केमिस्ट असोसिएशन - अध्यक्ष
आम्ही साबण वापरायला लागलो
कोरोनापासून संरक्षण होण्यासाठी आता साबणाचा वापर करतो. कार्यालय, बँक आदी ठिकाणी गेल्यावर त्या ठिकाणी असलेल्या सॅनिटायझरचा वापर करतो.
- शशिकांत म्हात्रे, नागरिक
कोरोनाकाळात घरात वापरासाठी सॅनिटायझर खरेदी करत होतो. परंतु साबणाच्या तुलनेत सॅनिटायझर महाग असल्याने घरी स्वच्छतेसाठी साबण वापरतो. परंतु घराबाहेर जाताना सोबत सॅनिटायझर बाळगून त्याचा वापर करतो.
- अक्षय बारवे, नागरिक