CoronaVirus News: वाशी आरटीओ कार्यालयातील गर्दीमुळे कोरोनाला आमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 12:15 AM2021-04-06T00:15:39+5:302021-04-06T00:15:52+5:30
अधिकारी-कर्मचारी धास्तावले : सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करून एकावेळी केवळ एकालाच प्रवेश
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी कमी करण्याची खबरदारी घेतली जात असली, तरी वाशी येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) गर्दी हटत नसल्याचे चित्र सोमवारी सकाळी पाहावयास मिळाले.
शिकाऊ परवाना, फिटनेस, ब्रेक टेस्टिंगसाठी आधीच अपॉइंटमेंट घेतल्यामुळे नागरिक दररोज आरटीओ कार्यालयात हजेरी लावत आहेत. मात्र, ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर या गर्दीमुळे अधिकारी-कर्मचारी धास्तावले असून, सोमवारी दुपारपासून मात्र सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करून एकावेळी केवळ एकालाच प्रवेश देण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
वाशी आरटीओ कार्यालयात एकूण ३६ खिडक्यांची सुविधा आहे. शिकाऊ वाहन परवाना काढण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त आहे. शिकाऊ वाहन परवाना काढण्यासाठी दररोज साधारण १२० जणांना अपॉइंटमेंट दिली जाते. ही परीक्षा बुडाल्यास नागरिकांना पुन्हा नव्याने ऑनलाईन अपॉइंटमेंट घ्यावी लागते. ‘सरकारी काम वर्षभर थांब’ असा वाईट अनुभव आल्याची माहिती घणसोली गावचे रमेश कृ. म्हात्रे यांनी दिली. ‘कोरोना’ची भीती असूनही नागरिक ‘आरटीओ’त येत आहेत. ‘फिटनेस’ सर्टिफिकेटसाठी येणाऱ्या नागरिकांची संख्याही मोठी आहे. सरकारच्या नियमावलीनुसार इमारतीच्या प्रवेशद्वारातून प्रत्येक वेळेला केवळ पाचजणांना प्रवेश दिला जात आहे. नागरिकांनी अपॉइंटमेंट घेतली असल्याने त्यांना आरटीओत येऊ नये असे अधिकारी किंवा कर्मचारी सांगू शकत नाही. त्यामुळे प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्यांना खबरदारीच्या सूचना करण्यात आल्या असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी सांगितले.