उद्योगांची गाडी रुळावर आणण्यासाठी कसरत सुरू; नुकसान भरून काढण्याचं आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2020 12:39 AM2020-10-16T00:39:54+5:302020-10-16T00:41:03+5:30

Corona Lockdown Effect on Industry: कामगारांची कमतरता : तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये जवळपास ११७४ कारखाने आहेत. यामधील अत्यावश्यक सेवेशी संबंधित असणारे ३७० कारखाने लाॅकडाऊनमध्येही सुरू होते.

Corona Lockdown Effect; Exercises to get the industry on track; The challenge of compensating | उद्योगांची गाडी रुळावर आणण्यासाठी कसरत सुरू; नुकसान भरून काढण्याचं आव्हान

उद्योगांची गाडी रुळावर आणण्यासाठी कसरत सुरू; नुकसान भरून काढण्याचं आव्हान

Next

नामदेव माेरे 

नवी मुंबई  : ठाणे-बेलापूर व तळोजा औद्योगिक वसाहतीमधील कारखाने पुन्हा सुरू होऊ लागले आहेत. सहा  महिन्यांत झालेले प्रचंड आर्थिक नुकसान भरून काढण्याचे आव्हान उद्योजकांसमोर उभे राहिले आहे. कारखाने सुरू करण्याची परवानगी मिळाली असली तरी कामगार उपलब्ध नसल्यामुळे पूर्ण क्षमतेने कारखाने सुरू करण्यात अडथळे निर्माण होत आहेत. 

कोरोनाचा सर्वाधिक फटका औद्योगिक वसाहतींना बसला होता. ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहतीमध्ये जवळपास ४५०० कारखाने आहेत. अत्याश्यक सेवा देणारे कारखाने वगळता इतर सर्व उद्योग बंद ठेवण्यात आले होते. महाराष्ट्रातील व इतर राज्यांतील कामगारही त्यांच्या मूळ गावी गेले होते. अद्याप ५० टक्के कामगार कामावर येऊ शकलेले नाहीत. यामध्ये इतर राज्यांतील कामगारांची संख्या मोठी आहे. कामगारच नसल्यामुळे शासनाने परवानगी देऊनही कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू करता येत नाहीत. कामगारांना घेऊन येण्यासाठी रेल्वे सुरू करावी, अशी मागणीही उद्योजकांनी केली आहे. अनेकांनी खासगी बसेसनी कामगारांना घेऊन येण्याची तयारी सुरू केली आहे. 

तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये जवळपास ११७४ कारखाने आहेत. यामधील अत्यावश्यक सेवेशी संबंधित असणारे ३७० कारखाने लाॅकडाऊनमध्येही सुरू होते. उर्वरित ८०४ कारखान्यांमधील काही कारखाने सुरू  झाले असून, काही सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. कामगारांची कमतरता हीच प्रमुख समस्या सध्या मोठ्या प्रमाणात सर्वांसमोर आहे. 

कुठल्या क्षेत्रात उद्योग सुरू ?

नवी मुंबई व तळोजामध्ये लाॅकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा देणारे उद्योग सुरू होते. उत्पादन करणारे कारखाने बंद होते. शासनाने आदेश दिल्यानंतर सर्व कारखाने सुरू होत आहेत. आयटी कंपन्या, सेवा उद्योग व छोटे कारखाने सुरू झाले आहेत

दिवाळीपर्यंत सर्व सुरळीत होईल 

औद्योगिक वसाहतीमधील अनेक कारखाने सहा महिने बंद होेते. बंद कारखाने सुरू करताना कामगारांची कमतरता सर्वांनाच जाणवू लागली आहे. याशिवाय कारखान्यांची देखभाल-दुरुस्ती, कच्चा माल व इतर काही समस्या आहेत. हे सर्व प्रश्न सुटण्यासाठी अजून एक महिन्याचा कालावधी लागेल. 

तळोजामध्ये  50000कोटींचा फटका बसला

नवी मुंबईमधील ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहत व तळोजा औद्योगिक वसाहतीमधील  अनेक कारखाने लाॅकडाऊनच्या काळात बंद होेते. सहा महिन्यांत तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये ५० हजार कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली होती. नवी मुंबईमध्ये यापेक्षाही जास्त व्यवहार ठप्प झाले असण्याची शक्यता आहे.

ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहतीमधील कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास मनुष्यबळाची कमतरता हे कारण प्रमुख आहे. गावी गेलेल्या कामगारांना परत  आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. परराज्यातील कामगारांना आणण्यासाठी वाहतुकीची समस्या जाणवत आहे. 
- के. आर. गोपी, अध्यक्ष, टीटीसी एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशन (टीएमआयए)

तळोजातील अत्यावश्यक सेवा देणारे उद्योग लाॅकडाऊनमध्येही सुरू होते. उर्वरित कारखाने सुरू करण्यासही परवानगी मिळाली आहे. कामगार व इतर काही अडचणींमुळे पूर्ण क्षमतेने कारखाने सुरू होत नाहीत. पुढील एक महिन्यात सर्व व्यवहार सुरू होऊ शकतील. 
- सतीश शेट्टी, अध्यक्ष, तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशन (टीआयए)

Web Title: Corona Lockdown Effect; Exercises to get the industry on track; The challenge of compensating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.