कोरोना चाचण्यांत कंजुषी नाहीच; २७ ठिकाणी केंद्रे, शहरात अडीच लाख नागरिकांच्या चाचण्या पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2020 12:18 PM2020-10-21T12:18:34+5:302020-10-21T12:20:27+5:30
काेरोनाची साखळी खंडित करण्यासाठी जास्तीतजास्त नागरिकांच्या चाचण्या करण्याची भूमिका महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी घेतली आहे. रुग्ण वाढले, तरी चालतील, पण चाचण्यांची संख्या कमी होता कामा नये, अशा सूचना आरोग्य विभागाला दिल्या आहेत.
नामदेव मोरे
नवी मुंबई : शहरात रुग्णांची संख्या कमी होत असली, तरी कोरोना चाचण्यांमध्ये कंजुषी न करण्याची भूमिका महानगरपालिकेने घेतली आहे. आतापर्यंत अडीच लाख नागरिकांच्या चाचण्या पूर्ण झाल्या असून, शहरात २७ ठिकाणी तपासणी केंद्र सुरू केली आहेत.
काेरोनाची साखळी खंडित करण्यासाठी जास्तीतजास्त नागरिकांच्या चाचण्या करण्याची भूमिका महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी घेतली आहे. रुग्ण वाढले, तरी चालतील, पण चाचण्यांची संख्या कमी होता कामा नये, अशा सूचना आरोग्य विभागाला दिल्या आहेत. आवश्यक त्या सर्व ठिकाणी अँटिजन व आरटीपीसीआर चाचण्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जूनपर्यंत १२ हजार नागरिकांच्या चाचण्या झाल्या होत्या. जुलैमध्ये ही संख्या २१ हजारावर पोहोचली.
१ ऑक्टोबरमध्ये शहरातील २ लाख नागरिकांच्या चाचण्या पूर्ण झाल्या होत्या. ऑक्टोबरमध्ये एक महिन्यात ७६ हजार चाचण्या केल्या होत्या. नोव्हेंबरमध्ये १८ दिवसांत ९० हजार चाचण्या पूर्ण झाल्या असून, यापुढेही याच गतीने चाचण्या सुरू ठेवल्या जाणार आहेत.