रेल्वे स्टेशनवर कोरोना चाचणी केंद्र झाले सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2020 01:04 AM2020-11-24T01:04:51+5:302020-11-24T01:05:15+5:30
नवी मुंबई महानगरपालिकेचा उपक्रम
नवी मुंबई : बेलापूर, नेरूळ व वाशी रेल्वे स्टेशनवर महानगरपालिकेने कोरोना चाचणी केंद्रे सुरू केली आहेत. सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपर्यंत ही केंद्रे सुरू ठेवली जाणार आहेत. पहिल्या दिवशी ४०० पेक्षा जास्त प्रवाशांच्या चाचण्या करण्यात आल्या.
कोरोनाची दुसरी लाट येण्याची संभाव्य शक्यता लक्षात घेऊन महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी आवश्यक त्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. जलद रुग्ण शोधण्यावर लक्ष केंद्रित केले असून लक्षणे दिसणाऱ्या नागरिकांची तत्काळ तपासणी करावी. रुग्णाच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तीचीही चाचणी करण्याचे आवाहन केले आहे. शहरात सर्व नागरी आरोग्य केंद्रांमध्ये चाचणी केंद्रे सुरू केली आहेत. एपीएमसी व एमआयडीसीमध्ये विशेष केंद्रे सुरू केली आहेत. याव्यतिरिक्त आता रेल्वे स्टेशनमध्ये कोरोना चाचणी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. बेलापूर, नेरूळ व वाशी स्टेशनवर ही सुविधा सुरू केली आहे. इतर रेल्वे स्टेशनवरही टप्प्याप्प्याने ही सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. प्रत्येक ठिकाणी ६ जणांचे पथक तैनात केले आहे. सकाळी ८ ते १ वाजेपर्यंत प्रवाशांच्या चाचण्या केल्या जाणार आहेत. पहिल्या दिवशीच ४०० पेक्षा जास्त प्रवाशांच्या चाचण्या
केल्या.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अन्न-धान्य खरेदीसाठी मुंबई, नवी मुंबईमधील ग्राहक व किरकोळ विक्रेते जात असतात. माथाडी कामगार, व्यापारी, गाळ्यांमध्ये काम करणारे कर्मचारी, एपीएमसीचे कर्मचारी यांची संख्या मोठी आहे. यामुळे बाजार समितीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी तेथील चाचणी केंद्रे अधिक गतिमान केली आहेत.