CoronaVirus: नवी मुंबईत कोरोनाने गाठले द्विशतक, १८ नवीन रुग्ण आढळले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 05:35 AM2020-04-30T05:35:41+5:302020-04-30T05:35:56+5:30
कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. बुधवारी १८ नवीन रुग्ण आढळले असून एकूण रुग्णसंख्या २०६ झाली आहे. चार दिवसांत ९८ रु ग्ण वाढले.
नवी मुंबई : येथील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. बुधवारी १८ नवीन रुग्ण आढळले असून एकूण रुग्णसंख्या २०६ झाली आहे. चार दिवसांत ९८ रु ग्ण वाढले.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धान्य मार्केटमधील तीन कामगारांना बुधवारी लागण झाली. कंपनीत मुलुंडमधून आलेल्या संगणक अभियंत्यामुळे त्यांना लागण झाली आहे. प्रसूती झालेल्या तीन व एक गरोदर महिलेचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. शिरवणे परिसरातील एका कुटुंबातील चौघांना ताप आल्याने ते तपासणीसाठी मनपाच्या फ्ल्यू क्लिनिकमध्ये गेले होते. त्या चौघांनाही कोरोना झाला आहे. बुधवारी १८ जणांना लागण झाली असून त्यामध्ये नेरूळचे सात, वाशी दोन, तुर्भे एक व कोपरखैरणेसह ऐरोलीमधील चौघांचा समावेश आहे. शहरातील रुग्णसंख्या २०६ झाली असून चार दिवसांत ९८ रुग्ण वाढले.
कोपरखैरणे सेक्टर २ मधील एक रु ग्ण पूर्ण बरा झाला असून आतापर्यंत २९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. नवी मुंबईमधील २,८७८ जणांची तपासणी केली आहे. त्यामधील १,८२९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अजून ८४३ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. आतापर्यंत ४,९४९ जणांना क्वारंटाइन केले आहे.
>कोरोना झालेल्या महिलेची प्रसूती
ऐरोली सेक्टर २० येथील ३७ वर्षीय गर्भवती महिला मुलुंड येथील मातृत्व हॉस्पिटलमध्ये नियमित तपासणीसाठी गेली होती. तेथे स्वॅब टेस्ट घेतली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. वाशी येथील नवी मुंबई महानगरपालिकेच्या डेडीकेटेड कोविड रुग्णालयात तिची प्रसूती सिझरीन पद्धतीने करण्यात आली आहे. यापूर्वी मनपा रु ग्णालयात घणसोलीमधील महिलेची प्रसूती केली होती. ती महिला आता कोरोनामुक्त झाली आहे.