नवी मुंबईमध्ये कोरोना चाचणी प्रयोगशाळा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2020 05:27 AM2020-08-05T05:27:20+5:302020-08-05T05:27:27+5:30
प्रतिदिन एक हजार चाचणी क्षमता; चाचणीसाठी लागणारा विलंब पूर्णपणे थांबणार
नवी मुंबई : महापालिकेच्या नेरुळ येथील माँसाहेब मीनाताई ठाकरे रुग्णालयात कोरोना चाचणी प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे. प्रतिदिन एक हजार चाचण्या येथे करणे शक्य आहे. यामुळे कोरोना चाचणीसाठी लागणारा वेळ पूर्णपणे थांबणार असून, रुग्णांवर वेळेत उपचार करणे शक्य होणार आहे.
महापालिकेची स्वत:ची लॅब नसल्यामुळे कोविडच्या तपासण्यांसाठी महानगरपालिकेस शासकीय अथवा खासगी लॅबवर अवलंबून राहावे लागत होते. त्यात तपासणी अहवाल प्राप्त होण्यास विलंब होत असल्याने, कोविड उपाययोजनांच्या अंमलबजवणीत अडथळा येत होता. या बाबीकडे पहिल्या दिवसापासून विशेष लक्ष दिले होते. त्या अनुषंगाने महापालिका आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर केवळ दोनच दिवसांत १६ जुलैपासून अँटिजेन टेस्ट करण्यास सुरुवात करण्यात आली. दिवसागणिक टेस्टिंग सेंटर वाढीवर भर देण्यात आला. सध्या २२ अँटिजेन टेस्टिंग सेंटरमधून दिवसाला २,५00 अँटिजेन टेस्ट होत आहेत. त्यामध्ये आता एका दिवसात १000 आरटी-पीसीआर चाचण्या करण्याची क्षमता आहे. या आॅटोमॅटिक लॅबची भर पडलेली आहे. यामुळे तपासणी वेगाने होणार आहे. प्रतिदिन १000 आरटी-पीसीआर चाचण्यांच्या करणे शक्य होणार आहे.
सध्या कोविडच्या काळात कोविडच्या तपासण्यांसाठी वापरली जाणार असली, तरी भविष्यात हेपॅटायटिस, स्वाइन फ्लू, लेप्टोस्पायरॅसिस, एचआयव्ही व इतर मॉलिक्युलर टेस्टसाठी या लॅबचा उपयोग होणार आहे.
महापालिका आयुक्तांचे आवाहन : ही संपूर्ण अॅटोमॅटिक लॅब महापालिकेसाठी एक कायमस्वरूपी महत्त्वाची उपलब्धी आहे व आरोग्य विभागाचे स्वयंपूर्ण सक्षमीकरण करणारी आहे. अँटिजेन टेस्ट आणि त्या जोडीला प्रतिदिन १000 आरटी-पीसीआर चाचण्या क्षमतेची महापालिकेची हक्काची अत्याधुनिक संपूर्ण आॅटोमॅटिक आर.टी.-पी.सी.आर. लॅब कोविड विरोधातील लढ्याला बळ देणारी असून, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महानगरपालिका करीत असलेल्या उपाययोजनांमध्ये स्वयंशिस्त पाळून सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.