१७ शिक्षकांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह, ३१ डिसेंबरपर्यंत शाळा बंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2020 01:12 AM2020-11-24T01:12:14+5:302020-11-24T01:12:25+5:30
उपचार सुरू; ३१ डिसेंबरपर्यंत शाळा बंदच
नवी मुंबई : शाळा सुरू करण्यापूर्वी शाळेतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर टेस्ट करणे बंधनकारक असल्याचे शासनाच्या माध्यमातून सांगण्यात आले होते. त्यानुसार नवी मुंबई शहरातील शाळांमधील शिक्षकांनी टेस्ट केली होती. त्यामधील सुमारे १७ शिक्षकांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. दिवाळीनंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ३१ डिसेंबरपर्यंत शहरातील सर्वच शाळा बंद राहणार आहेत.
शालेय शिक्षण विभागाने दिवाळीनंतर म्हणजेच २३ नोव्हेंबरपासून सुरक्षेच्या उपाययोजना आणि नियमांचे पालन करून शाळा सुरू करण्याचे निर्देश दिले होते. शाळा सुरू करताना शिक्षक आणि शाळांमधील इतर कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार नवी मुंबई महापालिकेने १९ ते २१ नोव्हेंबरपर्यंत शहरातील महापालिका आणि खाजगी शाळांमधील सर्वच शिक्षक आणि कर्मचाऱ्यांसाठी आरटीपीसीआर चाचणी मोफत करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. त्यानुसार या तीन दिवसांत शहरातील सुमारे १,१९५ शिक्षकांची चाचणी करण्यात आली होती. मुंबई शहर आणि उपनगरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ३१ डिसेंबरपर्यंत शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार नवी मुंबई शहरातील सर्वच शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद राहणार आहेत. शिक्षकांच्या केलेल्या आरटीपीसीआर चाचणीमध्ये तब्बल १७ शिक्षकांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.