नवी मुंबईत कोरोना चाचण्या वाढविल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2020 12:13 AM2020-07-29T00:13:02+5:302020-07-29T00:13:17+5:30
प्रतिदिन दोन हजार चाचण्या : एपीएमसीमध्येही अँटिजेन तपासणी केंद्र सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी महानगरपालिकेने कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविले आहे. अँटिजेन व आरटीपीसीआर मिळून प्रतिदिन २ हजार संशयितांची चाचणी केली जात आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीमध्येही अँटिजेन चाचणी केंद्र सुरू करण्यात आले आहे.
नवी मुंबईमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी पदभार स्वीकारल्यापासून मिशन ब्रेक द चेन मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. याचा भाग म्हणून जास्तीतजास्त नागरिकांच्या चाचण्या करण्यावर व चाचणींचे अहवाल लवकर मिळेल, यावर लक्ष दिले आहे. शहरात १८ ठिकाणी अँटिजेन तपासणी केंद्र सुरू केले आहे. या चाचणीचा अहवाल अर्धा तासात मिळत आहे. सद्यस्थितीमध्ये प्रतिदिन या केंद्रामधून १,३०० जणांच्या चाचण्या केल्या जात आहेत. याशिवाय आरटीपीसीआरच्या जवळपास ७०० चाचण्या होत असून, दोन्ही मिळून रोज २ हजार जणांच्या चाचण्या केल्या जात आहेत. कोरोना झालेल्या रुग्णाच्या संपर्कातील २०पेक्षा जास्त नागरिकांचा शोध घेऊन त्यांच्याही तपासण्या केल्या जात आहेत. मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. तेथील परिस्थिती नियंत्रणात यावी, यासाठी तेथेही अँटिजेन चाचणी केंद्र सुरू केले आहे.
चाचण्यांची संख्या वाढविल्यामुळे रुग्णांची संख्याही वाढलेली निदर्शनास येणार आहे. रुग्णसंख्या कमी भासविण्याचा प्रयत्न केला जाणार नाही, असे धोरण मनपाने स्वीकारले आहे. लवकर रुग्ण शोधून त्यांचे अलगीकरण करण्यावर भर देण्यात येत आहे. वेळेत चाचण्या झाल्या, तर संबंधित रुग्णाकडून इतरांना लागण होणार नाही. यामुळे रुग्णांची संख्या वाढलेली दिसली, तरी त्यामुळे कोणीही काळजी करू नये, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले.
मृत्युदर कमी करण्यावर भर
शहरात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यावर लक्ष देण्यात येत आहे. ज्येष्ठ नागरिक, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, किडनीचे विकार असणाºया व्यक्तींची विशेष काळजी घेतली जात आहे. याकरिता सर्वेक्षण करताना अशा व्यक्तींची वेगळी नोंद करण्यात येत आहे.
लक्षणे दिसल्यास लपवू नका
महानगरपालिकेने नागरी आरोग्य केंद्र व फ्ल्यू क्लिनिक सुरू केली आहे. रॅपिड अँटिजेनची मोफत तपासणी केली जात आहे. यामुळे कोणत्याही नागरिकाला ताप, सर्दी, घशात खवखव, श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे दिसल्यास तत्काळ रुग्णालयात जावे, असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे.