- नामदेव मोरे
नवी मुंबई : महानगरपालिकेच्या ‘ब्रेक द चेन’ मोहिमेस यश येऊ लागले असून, कोरोनामुक्तीच्या दिशेने नवी मुंबईची वाटचाल सुरू झाली आहे. रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे ४,६८५ बेड रिकामे आहेत. १४ केंद्रे पूर्णपणे बंद झाली असून, १० रुग्णालयांमध्ये १० पेक्षा कमी रुग्ण शिल्लक आहेत. सद्यस्थितीमध्ये फक्त ३.३६ टक्के रुग्ण शिल्लक असून, दिवाळीमध्ये नागरिकांनी संयम राखला व नियमांचे पालन केले, तर कोरोना लवकर हद्दपार करणे शक्य होणार आहे.
नवी मुंबईमध्ये १३ मार्चला कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला, तेव्हापासून सलग २४० दिवस कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. महानगरपालिका प्रशासनाने नवीन रुग्णालयांची उभारणी करण्यापासून ते जनजागृती करण्यापर्यंत अनेक उपाययोजना राबविल्या. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ मोहीम सुरू करण्यात आली. आतापर्यंत तीन लाख नागरिकांच्या चाचण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. जास्तीतजास्त चाचण्या करून वेळेत रुग्ण शोधून त्यावर उपचार करण्यावर भर देण्यात आला. रुग्ण सापडला की, त्याच्या संपर्कातील किमान २० जणांशी संपर्क साधून त्यांचीही आरोग्य तपासणी करण्यास सुरुवात झाली.
रुग्ण वाढले तरी चालतील, परंतु एकही रुग्णाचा मृत्यू होता कामा नये, हे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी स्वत: प्रत्येक उपाययोजनांवर बारीक लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. नागरी आरोग्य केंद्राच्या अधिकाऱ्यांशी स्वत: प्रतिदिन चर्चा करण्यास सुरुवात केली. मृत्यू झालेल्या प्रत्येक केसविषयी तज्ञांशी चर्चा सुरू केली. या सर्व उपाययोजनांमुळे शहरातील रुग्णसंख्या आटोक्यात येण्यास सुरुवात झाली आहे.
नोव्हेंबर महिन्यातील पहिल्या आठवड्यात सातत्याने रुग्ण वाढीपेक्षा रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. शुक्रवारपर्यंत शहरातील एकूण रुग्णांची संख्या ४५,२८८ होती. त्यापैकी तब्बल ४२,८५५ जण बरे होऊन घरी परतले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.६२ झाले आहे. मृत्यूचा दर साडेतीन टक्क्यांवरून २.०२ वर आला आहे. सद्यस्थितीध्ये फक्त ३.३६ टक्के रुग्ण शिल्लक आहेत.
महानगरपालिकेने शहरात स्वत:ची व खासगी मिळून ४१ उपचार केंद्रे सुरू केली होती. त्यामधील १४ केंद्र पूर्णपणे बंद झाली असून, १० केंद्रांमधील रुग्णसंख्या दहापेक्षा कमी असल्यामुळे पुढील आठवड्यात तीही बंद होण्याची शक्यता आहे. शहरात ६,०९८ बेडची व्यवस्था केली असून, त्यामधील फक्त १,४१३ बेडचा वापर सुरू आहे. ४,६८५ बेड शिल्लक आहेत. आयसीयू, व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन युनिटची उपलब्धताही मोठ्या प्रमाणात आहे.