नवी मुंबई : शहरात कोरोना लसीकरणाला सुरुवात करून ७२ दिवस पूर्ण झाले आहेत. या कालावधीमध्ये ८७ हजार ७३० नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. मनपा क्षेत्राची लोकसंख्या जवळपास १४ लाख असून, प्रत्येक नागरिकांना वेळेत लस मिळवून देण्यासाठी लसीकरणाची गती वाढविण्याची मागणी केली जात आहे. रिक्षा चालक संघटनांनीही सर्व चालकांना लस देण्याची मागणी केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील सर्व नागरिकांचे लसीकरण लवकरात लवकर करण्याची मागणी नागरिकांकडून होऊ लागली आहे. नवी मुंबईमध्ये १६ जानेवारीपासून आतापर्यंत २३ हजार ६५ आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. पोलीस व इतर पहिल्या फळीतील १६,५९७ जणांना व ज्येष्ठ नागरिकांसह सहव्याशी असणाऱ्या ४८ हजार ६८ जणांना लस देण्यात आली आहे. आतापर्यंत ८७,७३० जणांचे लसीकरण पूर्ण झाले असून, यामधील १८,९१२ जणांना दुसरा डोसही देण्यात आला आहे. वास्तविक शहराची लोकसंख्या १४ लाख आहे. प्रत्येक नागरिकांना लवकरात लवकर लस उपलब्ध करून द्यायची असेल, तर लसीकरणाचा वेग वाढविण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. शासन व महानगरपालिकेने आरोग्य कर्मचारी, पहिल्या फळीतील कर्मचारी व ज्येष्ठ नागरिकांसह सहव्याधी असणारांना लस देण्यात आली आहे. शहरातील सर्व रिक्षा चालकांनाही लस देण्यात यावी, अशी मागणी संघटनांनी करण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाचे यंशयित रुग्ण व अनेक पॉझिटिव्ह आलेले रुग्ण चाचणीपूर्वी शहरातील रिक्षाने प्रवास करत असतात. रिखा चालकांचा अनेक नागरिकांशी संपर्क येत असते. सद्यस्थितीमध्ये नवी मुंबईमध्ये ३० हजारांपेक्षा जास्त रिक्षा चालक असून, त्या सर्वांना लस द्यावी, अशी मागणी चालकांनी केली आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये रिक्षा व्यवसायाचा समावेश आहे. शहरात जवळपास ३० हजार रिक्षा चालक व्यवसाय करत आहेत. या सर्वांचा दिवसभर अनेक नागरिकांशी संपर्क येत असतो. या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी त्यांना कोरोना लस देण्यात यावी. - दत्तात्रय फडतरे, सचिव, नेरुळ विभाग कल्याणकारी संस्था
corona vaccination :७२ दिवसांमध्ये ८७ हजार नागरिकांचे लसीकरण, नवी मुंबईमध्ये लसीकरणाचा वेग वाढविण्याची गरज
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 12:26 AM