नवी मुंबई : शहरात पुन्हा कोरोना लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. पुरेसे डोस उपलब्ध नसल्यामुळे १७ एप्रिलला शहरातील ४९ पैकी पाचच ठिकाणी पहिला डोस मिळणार आहे. २५ ठिकाणी दुसरा डोस उपलब्ध असणार आहे. उर्वरित केंद्र बंद राहणार आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेने जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी तयारी केली आहे. शहरात महानगरपालिकेची २८ व २१ खासगी अशी एकूण ४९ केंद्रे सुरू केली आहेत. आतापर्यंत १ लाख ६५ हजार ४८० नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. प्रतिदिन सरासरी ७ हजार नागरिकांचे लसीकरण केले जात आहे; परंतु उपलब्ध लसीचा साठा संपत आल्यामुळे शनिवारी लसीकरणाच्या नियोजनामध्ये बदल करण्यात आला आहे. वाशी, ऐरोली व नेरूळ रुग्णालय, तुर्भे माता बाल रुग्णालय व वाशी सेक्टर ५ मधील ईएसआयसी रुग्णालयामध्ये कोविशिल्डचा पहिला व दुसरा डोस सुरू असणार आहे. याशिवाय कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस घेता येणार आहे.महानगरपालिकेच्या सीबीडी, बेलापूर, सेक्टर ४८ नेरूळ, करावे, कुकशेत, शिरवणे, तुर्भे, पावणे, इंदिरानगर, जुहूगाव, वाशीगाव, खैरणे, घणसोली, राबाडा, कातकरीपाडा, ऐरोली, चिंचपाडा, दिघा, इलठाणपाडा, या नागरी आरोग्य केंद्रांमध्ये कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस घेता येणार असल्याची माहिती महानगरपालिका प्रशासनाने दिली आहे.
Corona Vaccine : तुटवड्यामुळे पाच ठिकाणी मिळणार पहिला डोस, ४९ पैकी २५ ठिकाणीच मिळणार दुसरा डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 7:35 AM