नवी मुंबईत कोरोनाच्या बळींनी गाठले शतक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 11:49 PM2020-06-10T23:49:48+5:302020-06-10T23:49:56+5:30
मृतांचा आकडा १०१ : तुर्भेमध्ये सर्वाधिक ३० जणांचा मृत्यू : नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
नामदेव मोरे
नवी मुंबई : महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये आतापर्यंत कोरोनामुळे १०१ जणांचा मृत्यू झाला आहे. प्रतिदिन मृतांचा आकडा वाढत असून वाढता प्रादुर्भाव रोखण्यात प्रशासनाला अपयश येऊ लागले आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून योग्य उपचार न मिळाल्यामुळे व मानसिक ताणामुळे हृदयविकाराचा झटका येऊनही अनेकांचा मृत्यू झाला असून, शहरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नवी मुंबईमध्ये बुधवारी पाच जणांचा मृत्यू झाला. यामध्ये तुर्भेमधील दोन, कोपरखैरणेतील दोन व बेलापूरमधील एकाचा समावेश आहे. शहरात १३ मार्चला कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. वाशीमध्ये आलेल्या फिलीपाईन्सच्या नागरिकास प्रथम कोरोनाची लागण झाली. पहिला रुग्ण सापडल्यानंतर महानगरपालिकेचे अनेक अधिकारी तो शहरातील रहिवासी नसल्याचा दावा खाजगीत करीत होते. या नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यूही झाला. यानंतर महानगरपालिकेच्या रुग्णालयात गोवंडीमधील एका महिलेचा मृत्यू झाला. यानंतरही प्रशासनातील काही अधिकारी सदर महिला नेरूळमधील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी गेली होती. प्रकृती गंभीर झाल्यानंतर मनपा रुग्णालयात दाखल केले होते, असे सांगत होते. सदर महिलेचा समावेश नवी मुंबईमधील मृतांच्या यादीमध्ये करण्यात आलेला नाही. कोरोनाचे रुग्ण सापडू लागल्यानंतर महानगरपालिका प्रशासन कठोर भूमिका घेण्यात अपयशी ठरले. सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील रुग्णांचे वाढते प्रमाण, मुंबईत अत्यावश्यक सेवेसाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे नवी मुंबईत वाढणारा प्रादुर्भाव व झोपडपट्टीसह बैठ्या चाळींत रुग्णांची झपाट्याने वाढ होऊ लागल्यानंतरही प्रशासनाने कठोर पावले उचलली नाहीत. पालिका प्रशासनाने वेळेत ठोस उपाययोजना केली नसल्यामुळे नवी मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या तब्बल ३,२१९ झाली आहे. कोरोना बळींनी शंभरी पूर्ण केली आहे. ९० दिवसांमध्ये १०१ जणांचा मृत्यू झाला आहे. याचाच अर्थ प्रतिदिन सरासरी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मागील काही दिवसांमध्ये प्रतिदिन २ ते ७ जणांचाही मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले आहे.
घरातील दोघांचा मृत्यू
1एपीएमसीमधील एका व्यापाºयाच्या वडिलांचे १२ मे रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. सदर व्यापारी व त्याच्या मुलाला काही दिवसांत कोरोनाची लागण झाली. २३ तारखेला २७ वर्षांच्या मुलाचा व २९ मे रोजी व्यापाºयाचाही मृत्यू झाला. एकाच घरात दोघांचा कोरोनामुळे व एकाचा वृद्धापकाळाने मृत्यू झाल्याने शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
डॉक्टरचाही मृत्यू
2सीवूड परिसरामध्ये राहणाºया डॉक्टराचाही कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृत्यू झाल्यानंतर पाच दिवस त्यांचा वैद्यकीय अहवाल आला नव्हता. डॉक्टरच्या मृत्यूच्या दुसºया दिवशी त्यांच्या पत्नीचाही मृत्यू झाला होता. या घटनेमुळे महानगरपालिकेत अहवाल येण्यासाठी वेळ लागत असल्याचे शहरवासीयांच्याही निदर्शनास येऊन नागरिकांनी नवी मुंबईत स्वतंत्र तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्याची मागणी केली.
नवी मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या तब्बल ३,२१९ झाली आहे.
विभागनिहाय मृत्यू झालेल्यांचा तपशील
विभाग मृत्यू
बेलापूर १२
नेरूळ १४
तुर्भे ३०
वाशी ८
कोपरखैरणे २०
घणसोली ९
ऐरोली ६
दिघा २
शेतकºयांचा श्रावणबाळही काळाच्या पडद्याआड : कोरोनाचा सर्वाधिक फटका मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापाºयांना बसला आहे. भाजी मार्केटमधील एका प्रथितयश व्यापाºयाचाही मंगळवारी मृत्यू झाला. संबंधित व्यापारी प्रत्येक वर्षी राज्यभरातील जवळपास ५०० शेतकºयांना काशी यात्रेला पाठवत होते. आतापर्यंत हजारो शेतकºयांना काशी व चारधाम यात्रेला घेऊन जाणाºया व्यापाºयाचेही निधन झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.