नवी मुंबई : शहरात कोरोना नियंत्रणात येण्यास सुरुवात झाली आहे. विविध रुग्णालयांमधील ५९६५ पैकी तब्बल ४८३६ बेड रिकामे आहेत. ११ रुग्णालयांमध्ये एकही रुग्ण नाही. महानगरपालिकेच्या १२०० बेडची सुविधा असलेल्या सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये फक्त १५६ रुग्ण उपचार घेत असून उर्वरित सर्व बेड रिकामे आहेत.
राज्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर रेडझोन असलेल्या विभागांमध्ये नवी मुंबईचाही समावेश होता. झपाट्याने रुग्ण वाढू लागल्यामुळे शहरातील रुग्णालयीन यंत्रणा कोलमडली होती. रुग्णांना बेड उपलब्ध होत नव्हते. आयसीयू, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्सची सुविधा उपलब्ध होत नव्हती. यामुळे महानगरपालिकेने नवीन कोरोना उपचार केंद्र सुरु करण्यास सुरुवात केली. याशिवाय खासगी रुग्णालयांचाही आधार घेतला. शहरात तब्बल ५९६५ बेड उपलब्धता करण्यात आली. परंतु डिसेंबर अखेरपासूनच कोरोनाची संख्या झपाट्याने कमी होऊ लागली आहे.
शहरातील सर्व केंद्रांमध्ये मिळून फक्त ९१५ जण उपचार घेत आहेत. यामध्येही पनवेल व इतर परिसरातून येणाऱ्या रुग्णांचाही समावेश आहे. खासगी रुग्णालयांमधील रुग्ण संख्याही कमी झाली आहे. सद्यस्थितीमध्ये ११ रुग्णालयांत एकही रुग्ण नाही. ७ ठिकाणी १० पेक्षा कमी रुग्ण आहेत. महानगरपालिकेने आतापर्यंत ४ लाख ७६ हजार ७९७ नागरिकांची कोरोना तपासणी केली आहे. आतापर्यंत ६ लाख ४५ हजार ४८२ जणांना क्वाॅरंटाईन पूर्ण झाले आहे. आता ८१२४ जणांचेच क्वारंटाईन सुरु आहे. इंदिरानगर परिसरात रुग्ण संख्या शून्यावर आली असून तीन दिवस नवीन रुग्ण वाढला नाही. दिघा, कातकरीपाडा व इतर अनेक विभागांची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरु आहे.
सिडको एक्झिबिशन केंद्रात १५६ रुग्णांवर उपचारसद्यस्थितीमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ८०६ वर आली आहे. रुग्ण संख्या कमी झाल्यामुळे मनपाने १३ पैकी १२ उपचार केंद्रे बंद केली आहेत. सिडको एक्झिबिशन केंद्र सुरु ठेवले आहे. या केंद्रामध्ये १२०० बेडची व्यवस्था केली आहे. परंतु सद्यस्थितीमध्ये फक्त १५६ रुग्णच त्या ठिकाणी उपचार घेत आहेत.