वैभव गायकरपनवेल : जगभरात कोरोनाच्या साथीने थैमान घातले आहे. भारतामध्येदेखील या आजाराने शिरकाव केल्याने देशभरातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. त्यानुसार पनवेल महापालिकेचा आरोग्य विभागसुद्धा सज्ज झाला आहे. त्याचाच एक भाग म्हणून पनवेलच्या फडके नाट्यगृहात ११ ते ३१ मार्च या १७ दिवसांतील नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी ही माहिती दिली.
कोरोनाबाबत सतर्कता म्हणून पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. परदेशातून आलेल्या पालिका क्षेत्रातील १३ नागरिकांवर आरोग्य यंत्रणा लक्ष ठेवून आहे. १३ पैकी ४ नागरिक हाँग काँग येथे गेल्याने उर्वरित ९ नागरिकांच्या संपर्कात पालिकेचा आरोग्य विभाग असल्याची माहिती आयुक्त गणेश देशमुख यांनी या वेळी दिली. विशेष म्हणजे गर्दीच्या ठिकाणी जाणे नागरिकांनी टाळण्याचे आवाहन आयुक्त देशमुख यांनी केले आहे. याचाच भाग म्हणून पनवेल महानगरपालिकेच्या फडके नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेली दोन नाटके, तीन खाजगी कार्यक्रम तसेच १२ शाळांचे सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
यासंदर्भात संबंधित कार्यक्रमाची आगाऊ बुकिंग रक्कम संबंधितांना परत करण्यात येणार असल्याचे आयुक्त देशमुख यांनी सांगितले. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात एकही कोरोनाचा संशयित रुग्ण नसल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात परदेशातून येणाऱ्या नागरिकांवर आमचे विशेष लक्ष आहे. याकरिता एमजीएम रुग्णालयात ३९ खाटांचे आयसोलेशन सुरू करण्यात आले आहे. यामध्ये अत्यावश्यक वेळेला ९ जणांसाठी व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेता पर्यटक म्हणून बाहेर देशात जाणाºया नागरिकांनी आपले परदेश दौरे पुढे ढकलण्याची विनंती करण्यात आली आहे.
पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातूनदेखील ३१ मार्चपर्यंत कोणत्याही प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे. परीक्षा व शिक्षणाचे तास सोडल्यास इतर कोणत्याही अतिरिक्त कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांना शाळेत बोलावू नये, असे आवाहन आयुक्तांनी शाळेच्या मुख्याध्यापकांना केले आहे.पनवेल महानगरपालिका क्षेत्रात नजीकच्या काळात १३ जण परदेशातून आले आहेत. यापैकी ४ नागरिक पुन्हा हाँग काँगला गेले आहेत. उर्वरित ९ नागरिक पालिका क्षेत्रात वास्तव्यास आहेत. संबंधित नागरिकांना कोरोनाची लागण झाली नाही. मात्र खबरदारी म्हणून त्यांच्यावर आरोग्य विभागाची करडी नजर आहे. महापालिकेचे आरोग्य अधिकारी दररोज या नागरिकांच्या संपर्कात आहेत.कोरोनाच्या विषाणूचे प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याच्या दृष्टीने पालिकेने विविध पावले उचलली आहेत. ५00 नागरिकांची तपासणी करण्यात येईल अशी यंत्रणा उभी करण्यात आली आहे. पनवेलमध्ये एकही कोरोना रुग्ण नसून या आजाराचा संसर्ग थांबविण्याच्या दृष्टीने ३१ मार्चपर्यंत महापालिकेच्या माध्यमातून होणारे सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. - गणेश देशमुख, आयुक्त, पनवेल महानगरपालिका