नवी मुंबई : कोरोना व्हायरसमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील नागरिकांची काळजी घेण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या आरोग्य विभागाने रुग्णालयात याबाबत आवश्यक बाबींची पूर्तता करून उपाययोजना करून ठेवाव्यात आणि तत्पर राहावे, अशा सूचना स्थायी समितीचे सभापती नवीन गवते यांनी दिल्या आहेत.
कोरोना व्हायरसमुळे नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला असून, सोशल मीडियावर पसरणाऱ्या विविध अफवांमुळे नागरिक भयभीत झाले आहेत. नवी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने काय उपाययोजना केल्या आहेत, असा सवाल स्थायी समिती सभेत सदस्यांनी प्रशासनाला केला. त्यावर आरोग्य अधिकारी बाळासाहेब सोनावणे यांनी काही संशयित रुग्णांची यादी आली आहे. विमानतळावर या रु ग्णांच्या तपासण्या केल्या जात असून शहरात रुग्ण येण्याची शक्यता कमी असल्याचे सांगितले. तरीदेखील खबरदारीच्या उपाययोजना म्हणून महापालिकेच्या माध्यमातून संपूर्ण तयारी करण्यात आली असल्याचे सांगितले. नगरसेवक जयाजी नाथ यांनी शहरातील मेडिकल स्टोअरमध्ये मास्कची चंढ्या दराने विक्री केली जात असून, भयभीत झालेले नागरिक खरेदी करत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. याबाबत मेडिकल स्टोर्स असोसिएशनची मीटिंग घेऊन सूचना देण्याची मागणी त्यांनी केली. नगरसेवक रंगनाथ औटी यांनी शहरातील नागरिकांना कोरोना व्हायरससारखा आजार होऊ नये यासाठी प्रशासनाने काय उपाययोजना केल्या आहेत, असा सवाल उपस्थित करीत भयभीत झालेल्या नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात यावी अशी सूचना केली.