कोरोनामुळे स्वातंत्र्य दिन विद्यार्थ्यांविना होणार साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2020 01:53 AM2020-08-15T01:53:02+5:302020-08-15T01:53:11+5:30
पनवेल तालुक्यातील शाळा : शिक्षण विभागाने दिल्या सूचना
कळंबोली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा प्रथमच शाळांमध्ये विद्यार्थ्यांविना स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात येणार आहे. याबाबत प्रशासनाने परिपत्रक काढून पनवेल तालुक्यातील शाळांना कळविण्यात आले आहे.
पनवेल तालुक्यातील जिल्हा परिषद, महापालिका शाळा , खासगी शिक्षण संस्था, महाविद्यालयामध्ये दरवर्षी स्वतंत्र्य दिनानिमित्त सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. लहान मुलांमध्ये मोठी उत्सुकता असते, परंतु यंदा कोरोनाच्या संसर्गाच्या महामारीमुळे गेल्या पाच महिन्यांपासून शाळा, महाविद्यालये बंद आहेत.
१५ आॅगस्ट, २०२०ला भारतीय स्वातंत्र्याचा ७३वा वर्धापन दिन आहे. मात्र, कार्यक्रमावर कोरोनाचे सावट पसरले आहे. त्यामुळे शाळा स्तरावर सकाळी ८ वाजून ३५ मिनिटांपूर्वी ध्वजारोहणाचा कार्यक्रम घेण्यात यावा, तसेच कार्यक्रमांतर्गत सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक, शिक्षक, शालेय समिती सदस्यांना मुभा देण्यात आली आहे.
तर, शाळेत या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांना बोलविण्यात येऊ नये, अशा सूचना प्राथमिक व माध्यमिक शाळांना पनवेल तालुका गट शिक्षणाधिकारी नवनाथ साबळे यांनी परिपत्रकाद्वारे सर्व शाळांना कळविण्यात आले आहे.
प्रथमच मुलांविना ध्वजारोहण
भारत स्वातंत्र्य झाल्यापासून पहिल्यांदाच शाळांमध्ये विद्यार्थ्यांविना ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडणार आहे. आतापर्यंत अतिवृष्टी, तसेच पूर आला असल्यास क्वचितच रायगड जिल्ह्यात विद्यार्थ्यांविना ध्वजारोहण झाले असेल, परंतु कोरोनामुळे पहिल्यांदाच संपूर्ण महाराष्ट्रात विद्यार्थ्यांविना शाळेत ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडणार आहे.