नवी मुंबईतील नागरिकांवर कोरोनामुळे मानसिक ताण, जगायचे कसे हा प्रश्न ?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 08:45 AM2021-05-10T08:45:22+5:302021-05-10T08:46:39+5:30
कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या वर्षापासून आहे. गेल्यावर्षी कोरोनाबाबत नागरिकांमध्ये भीती आणि संभ्रम होता.
योगेश पिंगळे -
नवी मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांमध्ये मानसिक ताण वाढला आहे. मला कोरोना झालाय, मी बरा होईन ना, मी सर्व काळजी घेतली होती, तरी कसा कोरोना झाला, असे अनेक प्रश्न कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना पडत आहेत. त्यांच्यात एक पॅनिक परिस्थिती निर्माण झाली असून, रोजगार बंद असल्याने या काळात जगायचे कसे, असादेखील प्रश्न पुढे उभा राहिला आहे. नागरिकांच्या मनातील भीती काढण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने मानसोपचारतज्ज्ञांची टीम तयार केली असून, कॉल सेंटरच्या माध्यमातून त्यांचे समुपदेशन केले जात आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या वर्षापासून आहे. गेल्यावर्षी कोरोनाबाबत नागरिकांमध्ये भीती आणि संभ्रम होता. त्यामुळे एखादा कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यावर त्याच्याकडे पाहण्याचा तसेच त्याला मदत करण्याचा दृष्टिकोन नागरिकांमध्ये नव्हता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये कोरोनाबाबत असलेले अनेक संभ्रम दूर झाले आहेत; परंतु या लाटेमध्ये कोविडबाधित रुग्णांच्या मृत्यूचा आकडा वाढत असल्याने वेगळी भीती निर्माण झाली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू केल्याने अनेकांचे रोजगार बंद आहेत. काहींच्या नोकऱ्या गेल्या असून, उत्पन्न बंद असल्याने कुटुंबाचा उदनिर्वाह, मुलांचे शिक्षण, कर्जाचे हफ्ते, घरभाडे, विद्युत बिल, औषधोपचार आदी खर्च कसा करायचा, याची चिंता लागली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोनाबाधित नागरिकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले असून, या काळात कुटुंबातील व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास आता नक्की काय करायचे, कुटुंबातील इतर व्यक्तींना बाधा तर होणार नाही ना, रुग्णालयात बेड मिळेल का, शारीरिक जुन्या काही व्याधी असल्याने मला काही होईल का, मला काही झाल्यास माझ्या कुटुंबाचे कसे होणार, असे अनेक प्रश्न पॉझिटिव्ह व्यक्तींच्या मनात निर्माण होत आहेत.
नागरिकांचे समुपदेशन करून मनोबल वाढविण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून गेल्या वर्षापासून हेल्पलाइनची सुविधा सुरू करून देण्यात आली आहे. विविध प्रश्नांसाठी नागरिक हेल्पलाइनवर कॉल करीत असून, मानसोपचारतज्ज्ञांकडून त्यांचे कौन्सिलिंग करून रिलॅक्सेशन थेरपी दिली जात आहे. तसेच त्या रुग्णांचा पुन्हा फॉलो अप घेऊन त्यांची विचारपूस करून धीर दिला जात आहे. त्यामुळे महापालिकेने नागरिकांसाठी तयार केलेली कौन्सिलिंगची हेल्पलाइन सुविधा नागरिकांसाठी उपयुक्त ठरत आहे.
रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय.. काय करू?
कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर अनेक रुग्ण पॅनिक होतात. त्यावेळी आता नेमके काय करायचे हे कळत नसल्याने तसेच कुटुंबातील इतर व्यक्तींच्या काळजीपोटी हेल्पलाइनवर कॉल करून शंकांचे निरसन आणि मार्गदर्शन करून घेतात.
कॉल करणाऱ्यांमध्ये पुरुषांचे प्रमाण अधिक
पुरुष सहसा व्यक्त होत नाहीत; परंतु कोरोनामुळे अनेक कुटुंबे बाधित झाली असून, कोविड रुग्णांमध्ये डिप्रेशन वाढले आहे. त्यामुळे तणाव दूर करण्यासाठी किंवा मनात येणाऱ्या विविध शंकांचे निरसन करण्यासाठी नागरिक हेल्पलाइनवर कॉल करीत असून, यामध्ये महिलांपेक्षा पुरुषांचे प्रमाण अधिक आहे.
मागच्या वर्षी कोरोनामध्ये नागरिकांची मानसिक स्थिती वेगळी होती. परंतु या लाटेमध्ये कोविड झाला म्हणजे आपल्या आयुष्याचे काही तरी होत आहे, असा समज कोविड रुग्णांमध्ये निर्माण होतो. कोविड आपल्यासाठी आता नवीन राहिलेला नाही. त्यामुळे चिंता न करता काळजी घेणे महत्त्वाचे आहे. सुरक्षा नियमांचा वापर करणे गरजेचे आहे. अफवांवर विश्वास न ठेवता कोणत्याही शंका असल्यास चिंता करण्याची गरज नाही. अशावेळी मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
- डॉ. योगीता सोळंके, मानसोपचारतज्ज्ञ
तरुणांना कुटुंबाची काळजी
कुटुंबातील कर्त्या व्यक्तीला कोरोनाची बाधा झाल्यास त्याच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक, लहान मुले यांनादेखील कोरोनाची लागण होईल का, किंवा आपल्याला काही झाल्यास आपल्या कुटुंबाचे काय होईल, असे अनेक प्रश्न त्यांच्यापुढे उभे राहत असून, ते मानसिक तणावाखाली येत आहेत. अशा व्यक्तींना हेल्पलाइनच्या माध्यमातून मानसोपचारतज्ज्ञांकडून करण्यात आलेल्या कौन्सिलिंगमुळे खूप फायदा होत आहे.