भाकरीच्या गृहोद्योगावर कोरोनाचे सावट; बचतगटांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 01:01 AM2020-05-27T01:01:59+5:302020-05-27T01:02:42+5:30
शहरी, ग्रामीण भागातील ४ ते ५ हजार गृहिणींवर उपासमारीची वेळ
- अनंत पाटील
नवी मुंबई : पांढऱ्या शुभ्र तांदळाच्या भाकरी मातीच्या चुलीवर आणि मशीनवर बनविल्या जातात. अनेक महिलांचे आर्थिक गणित या भाकरीच्या व्यवसायावर अवलंबून आहे. मात्र लॉकडाउनमुळे भाकरी तयार करणाºया गृहउद्योगांवर अवलंबून असणाºया ठाणे, रायगड, मुंबई आणि नवी मुंबई परिसरातील २५ ते ३० बचतगटांना फार मोठा फटका बसला आहे. जवळपास ४ ते ५ हजार महिलांवर उदरनिर्वाहाचे संकट ओढावले आहे.
तांदळाची भाकरी आणि रस्सा भाजीचा बेत जमून आल्यास त्याची अवीट गोडी चाखण्यासाठी खवय्यांची नेहमीच झुंबड उडते. या भाकºया लाकडाच्या चुलीवर, गॅसवर तयार केल्या जातात. ठाणे, रायगड, मुंबई आणि नवी मुंबईतील किनारपट्टीवरील आगरी-कोळी समाजाप्रमाणे इतर लोकांच्या रोजच्या आहारात आवर्जून भाकरीचा समावेश केला जातो. मोठमोठे हॉटेल्स, ढाबे तसेच पोळीभाजी केंद्रांप्रमाणे खास तांदळाच्या भाकरीची केंद्र सुरू करण्यात आल्याने अनेक महिलांना रोजगार मिळाला आहे.
बचत गटांनाही उत्पन्नाचे साधन उपलब्ध झाले आहे. एकट्या नवी मुंबई शहरात बेलापूर ते दिघा परिसरात ४०० ते ५०० महिला चुलीवर तर काही मशीनवर भाकरी बनवून आपल्या कुटुंबाची उपजीविका करीत आहेत. मात्र लॉकडाउनमुळे भाकरीचा गृहोद्योग ठप्प झाल्याने उपजीविकेवर परिणाम झाला आहे.
ठाणे, मुंबई, रायगड आणि नवी मुंबईत आगरी कोळी समाज मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. त्यांचे सण-उत्सव, साखरपुडा, हळदी समारंभ आणि लग्न कार्यात शेकडोच्या संख्येने तांदळाच्या भाकरीची आॅर्डर दिली जाते. मात्र कोरोनामुळे सर्व आॅर्डर रद्द झाल्याने महिलांवर उपासमारीची वेळ आली आहे.
एका लग्नासाठी कमीतकमी ५०० ते जास्तीतजास्त ४ हजार भाकऱ्यांची विक्री होते. मात्र कोरोनामुळे संचारबंदीत गर्दी टाळण्यासाठी इतर व्यवसायांप्रमाणे गृहोद्योग म्हणून ओळख मिळविलेल्या भाकरी उद्योगावरहीसंकट ओढावले आहे.
- सुनीता ठाकूर, अध्यक्षा, ज्ञानाई महिला मंडळ, कोपरीगाव, नवी मुंबई.