Coronavirus: लग्न समारंभावर कोरोनाच्या भीतीचे सावट; मंगल कार्यालयांचा सावध पवित्रा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2020 12:26 AM2020-12-02T00:26:45+5:302020-12-02T07:28:45+5:30
अनेकांनी केले बुकिंग रद्द
नवी मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या शक्यतेमुळे लग्न समारंभावर भितीचे सावट आहे. याचा परिणाम म्हणून अनेकांनी पूर्वनियोजित सोहळे स्थगित केले आहेत, तर मंगल कार्यालयांनीही सावध पावित्रा घेत, पूर्वी केलेले बुकिंग रद्द केले आहे. नवी मुंबई, पनवेलमध्ये दिवाळीनंतर कोरोनाच्या रुग्णांत वाढ हो आहे. त्यामुळे संबंधित महापालिकांनी नियम कठोर केले आहेत. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे सूचना नागरिकांना केल्या आहेत. नवी मुंबईसह पनवेल विभागात जवळपास १,८५0 मंगल कार्यालये आहेत. दिवाळीनंतर लग्नाचे १0 मुहूर्त आले आहेत. त्यामुळे अनेक कुटुंबांनी विवाहसाठी लग्नाचे हॉल बुक केले आहेत. मात्र, दुसऱ्या लाटेची चर्चा सुरू झाल्याने अनेकांनी मुहूर्त पुढे ढकलले आहेत. काहींनी याच मुहूर्तावर कोर्टात अगदी साध्या पद्धतीने विवाह समारंभ उरकण्याचा निर्णय घेतला आहे, तर काही मंगल कार्यालयांनीही पूर्वी घेतलेली बुकिंग सुरक्षिततेच्या कारणास्तव रद्द केले आहेत. शहरातील काही बड्या मंगल कार्यालयांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्चपासूनच बुकिंग घेणे बंद केले आहे.
दिवाळीनंतर लग्नाचे १० मुहूर्त
डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च महिन्यांमध्ये मुहूर्त पाहून मोठ्या प्रमाणात लग्न समारंभ पार पडतात. मात्र या महिन्यांमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली गेल्याने अनेक कुटुंबांमध्ये लग्नाचे मुहूर्त पुढे ढकलले गेले आहेत. काही कुटुंबांमध्ये कोर्टात साध्या पद्धतीने लग्न उरकून घेण्याचा निर्णय घेतला गेला आहे. यामुळे मंगल कार्यालये ओस पडत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
हॉलच्या बुकिंगच्या वेळीच नियमाच्या सूचना संबंधितांना दिल्या जातात, तसेच प्रत्येकाला मास्क लावणे आणि शारीरिक अंतर राखणे बंधनकारक आहे, शिवाय हॉलवर तपामान मोजण्याचे यंत्र बसविले आहे. -गिरीश बद्रा लोहाना समाज हॉल, कोपरखैरणे
कोरोनाविषयक नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाते. सरकारच्या निर्देशानुसार लग्न समारंभासाठी केवळ पन्नास लोकांना सहभागी होण्याची परवानगी आहे. त्यानुसार नागरिकही सजग झाले आहेत. त्याचा आनंद आहे. - विशाल टोळे, बेलापूर
मंगल कार्यालये आधीच बुक
बहुतेक मंगल कार्यालयांमध्ये मार्चनंतरचे बुकिंग केले गेले आहे. मात्र हे बुकिंगही कायम राहील का याची खात्री मंगल कार्यालय संचालकांना नाही. दिवाळीनंतर रुग्ण पुन्हा वाढू लागल्याने काही जणांनी चक्क मंगल कार्यालयांचे बुकिंग रद्द केले आहे. यामुळे मंगल कार्यालयांचे मालक, व्यावसायिक व कामगार चिंतेत पडले आहेत.