- नामदेव मोरे
नवी मुंबई: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला कोरोनाचा विळखा पडू लागला आहे. आतापर्यंत 12 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये हाॅटेल मधील 7 कर्मचारी, एक सुरक्षा रक्षक व चार व्यापा-यांचा समावेश आहे. बाजार पेठेमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून बाजार समिती बंद करण्याची मागणी होऊ लागली आहे.
व्यापारी, माथाडी कामगार, वाहतूकदार व शहरवासीयांच्या सुरक्षेसाठी बाजार समिती बंद करण्यात यावी अशी मागणी मोठ्याप्रमाणात केली जात आहे. भाजीपाला व फळ मार्केट मधील व्यापारी संघटनांनी यापुर्वीच अशाप्रकारचे पत्र दिले आहे. परंतु शासनाच्या आदेशामुळे मार्केट सुरू ठेवण्यात आले आहे. यामुळे मार्केट मधील कोरोना रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. आतापर्यंत धान्य मार्केट, भाजीपाला व मसाला मार्केट मधील चार व्यापा-यांना कोरोना ची लागण झाली आहे. मसाला मार्केट मधील एक हाॅटेल मधील तब्बल 7 कर्मचा-यांना कोरोना झाला आहे. फळ मार्केट मधील सुरक्षा अधिका-याला ही कोरोना ची लागण झाली आहे.
रूग्ण वाढू लागल्यामुळे महानगरपालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी बाळासाहेब सोनवणे यांनी मंगळवारी एपीएमसी पोलीस स्टेशन व तुर्भे विभाग अधिका-यांना पत्र देवून 14 दिवस पाचही मार्केट बंद करण्याचे आदेश दिले होते. वैद्यकीय अधिका-यांचे पत्र सोशल मिडीयावरून व्हायरल झाले होते. परंतु सायंकाळी महानगरपालिका आयुक्त, कोकण आयुक्त, शासनाचे वरिष्ठ अधिकारी यांची बैठक झाल्यानंतर वैद्यकीय आधिका-यांचे पत्र मागे घेण्यात आले व नवीन आदेश काढण्यात आला आहे. ज्या ठिकाणी कोरोना रूग्ण आढळला तेवढाच परिसर बंद करून उर्वरीत मार्केट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बुधवारी एपीएमसी मधील पाचही मार्केट सुरू होती. पाच मार्केट मध्ये 519 वाहनांमधून कृषी माल विक्रीसाठी आला व 768 वाहनांमधून कृषी माल मुंबई व नवी मुंबई मधील किरकोळ विक्रेत्यांपर्यंत पोहचविण्यात आला. भाजीपाल्याचे 326 टेंपो थेट मुंबईत पाठविण्यात आले आहेत.
12 ते 15 हजार उपस्थिती
बाजार समिती च्या पाच मार्केट मधील गर्दी पुन्हा वाढू लागली आहे. एपीएमसी च्या पाच मार्केट मध्ये प्रतिदिन 12 ते 15 हजार नागरिक उपस्थित राहू लागले आहेत. भाजीपाला व फळ मार्केट मध्ये सर्वाधिक गर्दी होत असून सोशल डिस्टंन्सींग नियमांचे उल्लंघन होत आहे. अनेकजण मास्क चा वापर करत नाहीत. गर्दीमुळे कोरोना मोठ्याप्रमाणात पसरण्याची भिती बाजार समिती मधील अधिकारी व कर्मचारी व्यक्त करत आहेत. अनेक व्यापारी ही सुरक्षेच्या मुद्यावरून चिंता व्यक्त करत आहेत. एपीएमसी सुरू ठेवण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी केली जात आहे.
महानगरपालिकेने एपीएमसीमधील बंद केलेला परिसर
- मसाला मार्केट मधील के वींग मधील 9 ते 16 पर्यंत ची दुकाने व हाॅटेल बंद करण्यात आले आहे.
- भाजीपाला मार्केट मधील ई वींग मधील 889 ते 897 या गाळ्यांमधील व्यापार बंद करण्यात आला आहे.
- धान्य मार्केट मधील जी वींग मधील 9 ते 17 पर्यंत चे गाळे सील केले आहेत.
- फळ मार्केट मधील सुरक्षा अधिका-यास कोरोना झाल्यामुळे सुरक्षा अधिका-याची केबीन बंद केली आहे.
सुरक्षा अधिका-याचा सर्व मार्केटमध्ये वावर
फळ मार्केट मधील सुरक्षा अधिका-याला कोरोना झाला आहे त्याचा संपूर्ण मार्केट मध्ये मुक्त संचार होता. गत आठवड्यात सुरक्षा अधिका-याच्या पथकाने आंबा पिकविण्यासाठी वापरले जात असल्याचे औषध जप्त केले होते. नियम बाह्य काम करणा-यांवर कारवाई केली होती. अनेकांच्या संपर्कात हा अधिकारी आला असल्यामुळे फक्त सुरक्षा रक्षकांची केबीन बंद केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.