वेलनेस टीमकडून कोरोनाबाधित पोलिसांची भेट, कर्मचारी चार महिन्यांत बाधित

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2020 12:00 AM2020-09-17T00:00:52+5:302020-09-17T00:01:37+5:30

नवी मुंबई पोलीस दलातील सुमारे ९०० अधिकारी, तसेच कर्मचारी मागील चार महिन्यांत बाधित झाले आहेत.

Coronation-affected police visit from wellness team, staff interrupted in four months | वेलनेस टीमकडून कोरोनाबाधित पोलिसांची भेट, कर्मचारी चार महिन्यांत बाधित

वेलनेस टीमकडून कोरोनाबाधित पोलिसांची भेट, कर्मचारी चार महिन्यांत बाधित

Next

नवी मुंबई : कर्तव्य बजावताना कोरोनाची बाधा झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपचारांबाबत पोलीस प्रशासन गांभीर्याने दखल घेत आहे. त्याकरिता सक्रिय करण्यात आलेल्या वेलनेस टीमने मंगळवारी रुग्णालयात दाखल असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची भेट घेऊन धीर दिला.
नवी मुंबई पोलीस दलातील सुमारे ९०० अधिकारी, तसेच कर्मचारी मागील चार महिन्यांत बाधित झाले आहेत. त्यापैकी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. लॉकडाऊनदरम्यान बंदोबस्ताचे कर्तव्य बजावत असताना, अथवा पकडलेले आरोपी किंवा तक्रारदार यांच्या संपर्कात आल्याने त्यांना बाधा झाली आहे. मात्र, वेळीच मिळालेल्या उपचारामुळे त्यांच्यावरील संकट टळले आहे. सध्या ५५ जणांवर नेरुळच्या डी.वाय. पाटील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यापैकी चौघेजण आयसीयूमध्ये दाखल असून, दहा जणांना आॅक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. त्याशिवाय नेरुळ व कळंबोली येथील विशेष केंद्रातही काहींना क्वारंटाइन करण्यात आले आहे.
बंदोबस्तादरम्यान कोरोना झाल्याने आपल्याला किंवा परिवारावर कोणते संकट येऊ नये, अशी पोलिसांची भावना आहे. त्यामुळे कोरोनाबाधित पोलिसांच्या उपचाराची तत्परतेने काळजी घेण्यासाठी वेलनेस टीम तयार करण्यात आलेली आहे. उपायुक्त सुरेश मेंगडे, उपायुक्त शिवराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहायक आयुक्त विनोद चव्हाण, वरिष्ठ निरीक्षक एन. बी. कोल्हटकर, अर्जुन गरड आदींचा या वेलनेस टीममध्ये समावेश आहे. नवनियुक्त आयुक्त बिपिनकुमार सिंग, सहआयुक्त जय जाधव यांनीही या वेलनेस टीमच्या कार्याचा नुकताच आढावा घेतला, तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली या वेलनेस टीमने मंगळवारी प्रत्यक्ष रुग्णालयात जाऊन उपचारासाठी दाखल असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची भेट घेतली. यावेळी रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकासोबत उपायुक्त सुरेश मेंगडे, उपायुक्त शिवराज पाटील, सहायक आयुक्त विनोद चव्हाण, निरीक्षक एन. कोल्हटकर, अर्जुन गरड यांचा समावेश होता. यावेळी त्यांच्यावर सुरू असलेल्या उपचारासह त्यांना दिले जाणारे जेवण यांचा आढावा घेऊन प्रत्यक्ष चर्चेतून त्यांना इतर काही समस्या आहेत का, हेही जाणून घेतले.
यावेळी अचानक पीपीई किट घालून समोर वरिष्ठ अधिकारी उभे असल्याचे पाहून उपचारासाठी दाखल असलेले पोलीसही भारावून गेले. महामारीच्या काळात कर्तव्य बजावत असताना आपल्यावर जरी संकट कोसळले असले, तरी या काळात वरिष्ठ आपल्या पाठीशी असल्याच्या समाधानाची भावना यावेळी पोलिसांनी व्यक्त केली.

९०० पोलिसांवर उपचार
कोरोनाबाधित पोलिसांच्या उपचारात कसलीही कमी राहू नये, याकरिता काही खासगी रुग्णालयात सोय केलेली आहे. त्यामुळे ९००च्या जवळपास पोलीस व त्यांच्या परिवारातील सुमारे ५०० सदस्य कोरोनाबाधित होऊनही वेळीच उपचार मिळाल्याने सर्वजण सुखरूप आहेत. कोरोनाबाधित पोलिसांना वरिष्ठ तुमच्या पाठीशी आहेत, याची जाणीव करून देण्यासह त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी रुग्णालयाला भेट देण्यात आल्याचे वेलनेस टीमकडून सांगण्यात आले.

Web Title: Coronation-affected police visit from wellness team, staff interrupted in four months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.