रायगडमध्ये कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ५७ टक्के; नागरिकांनी खबरदारी घ्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 12:31 AM2020-05-28T00:31:19+5:302020-05-28T00:31:30+5:30

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

Coronation-free rate in Raigad is 57%; Citizens should be careful | रायगडमध्ये कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ५७ टक्के; नागरिकांनी खबरदारी घ्यावी

रायगडमध्ये कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ५७ टक्के; नागरिकांनी खबरदारी घ्यावी

googlenewsNext

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असला तरी उपचारानंतर ५७ टक्के रुग्ण बरे होत आहेत. त्यामुळे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात हे दिलासादायक चित्र आहे. नागरिकांनी घाबरून न जाता खबरदारी बाळगावी, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. मुंबई, पुणे, ठाणे, सुरत यासह अन्य ठिकाणांहून १ मे २०२० नंतर जिल्ह्यात ९६ हजार नागरिक आले आहेत. खारपाडा येथील चेकपोस्टवरच त्यांची माहिती घेतली जात आहे. तसेच त्यांचे थर्मल स्कॅनिंगही करण्यात येत आहे.

१० हजार नागरिकांना निरीक्षण कक्षात दाखल केले आहे, तर ८६ हजार नागरिक हे होम क्वारंटाइनमध्ये आहेत. त्यातील बहुतांश नागरिकांनी १४ दिवसांचा कालावधी पूर्ण केला आहे. १ मे रोजी रायगड जिल्ह्यात १०५ कोरोनाबाधित होते. आता हाच आकडा ८४० च्याही पुढे गेलेला आहे. कोरोनाबाधितांवर उपचार करण्यात आल्यानंतर बरे होण्याचे प्रमाण हे ५७ टक्के आहे. त्याचप्रमाणे पनवेल महापालिकेचेही प्रमाण ५७ टक्के एवढे आहे.

तब्बल ४८२ रुग्ण बरे होऊन आपापल्या घरी गेले आहेत, असे चौधरी यांनी स्पष्ट केले. बाधितांचा वाढता आकडा चिंताजनक असल्याने अलिबाग नेहुली येथील क्रीडा संकुल आणि कुरुळ वसाहतीमधील आरसीएफची शाळा अधिग्रहीत करण्यात येत आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांवर या ठिकाणी उपचार होणार आहेत.

विक्रम-मिनीडोरला अटींवर परवानगी

१. रायगड जिल्ह्यामध्ये सुमारे आठ हजार विक्रम-मिनीडोर रिक्षा आहेत. त्यावर ६० हजारांहून अधिक कुटुंबांचा चरितार्थ चालतो; मात्र लॉकडाउनमुळे गेल्या दोन महिन्यांपासून हा व्यवसाय ठप्प पडला आहे.

२.विक्रम-मिनीडोर चालक-मालक यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. व्यवसाय सुरू करण्याची परवानगी मिळावी यासाठी संघटनेने मागणी केली होती.

३.चौथ्या लॉकडाउनमुळे नियमांमध्ये शिथिलता आली आहे. त्यानुसार सामाजिक अंतर राखून आणि सहाऐवजी तीन प्रवासी घेऊन विक्रम-मिनीडोर रिक्षाचा व्यवसाय करण्याला मुभा आहे. मात्र संबंधितांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे, असे चौधरी यांनी सांगितले.

Web Title: Coronation-free rate in Raigad is 57%; Citizens should be careful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.