coronavirus: नवी मुंबईमध्ये कोरोनाचे 1 हजार बळी, ऐरोलीत सर्वाधिक मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2020 02:55 AM2020-12-08T02:55:38+5:302020-12-08T02:55:55+5:30
Navi Mumbai coronavirus: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवी मुंबईमध्ये २७० दिवस प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे. या कालावधीमध्ये एकूण रुग्णसंख्या ४९ हजारपेक्षा जास्त झाली आहे.
- नामदेव मोरे
नवी मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवी मुंबईमध्ये २७० दिवस प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे. या कालावधीमध्ये एकूण रुग्णसंख्या ४९ हजारपेक्षा जास्त झाली आहे. कोरोना बळींचा आकडा १ हजार झाला असून ऐरोलीमध्ये सर्वाधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ६० ते ७० वयोगटात मृत्यूचे प्रमाण जास्त असल्याचे निदर्शनास आले आहे. वाशीमध्ये आलेल्या फिलीपाईन्स नागरिकाला १३ मार्चला कोरोनाची लागण झाली व नवी मुंबईमधील प्रादुर्भावास सुरुवात झाली. कोरोना झालेल्या पहिल्या रुग्णाचा मुंबईत उपचारादरम्यान मृत्यू झाला व नागरिकांमध्ये या आजाराविषयी भीती निर्माण झाली. सुरुवातीला धीम्या गतीने कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला, परंतु जूनअखेरपासून वेगाने शहरभर कोरोना रुग्णांचा आकडा वाढण्यास सुरुवात झाली. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापारी, कामगार व इतर घटकांनाही कोरोनाची लागण झाल्यानंतर काही व्यापाऱ्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. भाजी मार्केटमधील २७ वर्षांच्या तरुण व्यापाऱ्याचाही मृत्यू झाला. शहरातील मृत्युदर वाढून साडेतीन टक्के झाला. प्रत्येक विभागातील कोरोना बळींचा आकडा वाढू लागला. सीवूडमध्ये डॉक्टर व त्याच्या पत्नीचाही मृत्यू झाला. २७० दिवसांमध्ये कोरोना बळींचा आकडा एक हजारवर गेला आहे.
सर्वाधिक १५४ बळी ऐरोलीमध्ये गेले आहेत. सर्वात कमी ४४ जणांचा दिघा परिसरात मृत्यू झाला आहे. ज्येष्ठ नागरिकांमध्ये मृत्यूची टक्केवारी सर्वात जास्त आहे. ६० ते ७० वयोगटातील २९२ व ५० ते ६० वयोगटातील २६४ जणांचा मृत्यू झाला आहे. ज्येष्ठ नागरिकांमध्ये हृदयरोग, मधुमेह, रक्तदाब व इतर सहव्याधींचे प्रमाण जास्त असल्यामुळे कोराना झाल्यानंतर मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. २० ते ६० या वयोगटातील नागरिकांना नोकरी, व्यवसायासाठी वारंवार घराबाहेर पडावे लागत असल्यामुळे त्यांच्यामध्ये कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण जास्त आहे.
महानगरपालिकेचे शून्य मृत्युदराचे उद्दिष्ट
महानगरपालिकेने शून्य मृत्युदराचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. जुलैमध्ये साडेतीन टक्क्यांवर मृत्युदर गेला होता. मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी मृत्युदर कमी करण्यावर विशेष लक्ष दिले व ते प्रमाण २ टक्क्यांवर आणले. हे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी प्रशासनाच्यावतीने प्रयत्न सुरू केले आहेत.