coronavirus: नवी मुंबईत एकाच दिवशी आढळले १०५ रुग्ण, चौघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 04:43 AM2020-05-12T04:43:37+5:302020-05-12T04:43:46+5:30
नवी मुंबईमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. शहरातील नेरूळ, तुर्भे, वाशी, कोपरखैरणे परिसरात कोरोनाची शंभरी पूर्ण झाली आहे. घणसोलीमध्येही मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळू लागले आहेत.
नवी मुंबई : नवी मुंबईमध्ये एकाच दिवशी कोरोनाचे १०५ रुग्ण वाढल्याने खळबळ उडाली आहे. शहरातील एकूण रुग्णांची संख्या ७७९ झाली आहे. तर, चौघांचा मृत्यू झाला आहे.
नवी मुंबईमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. शहरातील नेरूळ, तुर्भे, वाशी, कोपरखैरणे परिसरात कोरोनाची शंभरी पूर्ण झाली आहे. घणसोलीमध्येही मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळू लागले आहेत.
सोमवारी एकाच दिवसात तब्बल १०५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये तुर्भे, सानपाडामध्ये ३४, कोपरखैरणेमध्ये ३०, घणसोलीत १६, नेरूळमध्ये ८, ऐरोलीत ५, बेलापूर, वाशी व दिघामध्ये प्रत्येकी ४ रुग्ण सापडले आहेत. यापूर्वीच्या रुग्णांच्या संपर्कामुळे त्यांच्या परिवारातील सदस्यांना कोरोनाची लागण होत आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापारी व कामगारांच्या कुटुंबांतील जवळपास ३५ जणांना लागण झाली आहे. अद्याप १,५३६ जणांचा अहवाल प्रलंबित आहे.
पालिका कार्यक्षेत्रात चार जणांचा मृत्यू झाला. तुर्भे, घणसोली, कोपरखैरणे व दिघामध्ये एकाचा मृत्यू झाला असून बळींची संख्या १८ झाली आहे. दिवसभरात १४ रुग्ण बरे झाले आहे. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन नागरिकांनी खबरदारी घ्यावी. विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे.
पनवेलमध्ये नवे ३९ नवे रुग्ण
पनवेल : पनवेलमध्ये सोमवारी ३९ नवे रुग्ण सापडले आहेत. एकाच दिवशी सापडलेले ३९ रुग्ण हे आजपर्यंत पनवेलमधे सापडलेले सर्वाधिक बाधित रुग्ण आहेत. या रुग्णांमध्ये पनवेल महापालिका क्षेत्रात २४ तर ग्रामीणमधील १५ रुग्णांचा समावेश आहे. पालिका हद्दीत रुग्णांची संख्या १८० झाली आहे तर ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या ७० पर्यंत पोहोचली आहे.
उरणमध्ये दोन दिवसांत वाढले ४८ रुग्ण
उरण : कोरोना रुग्णाच्या संसर्गामुळे रविवारी उरण-करंजा येथील २१ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असतानाच सोमवारी आणखी २७ रुग्णांची भर पडली आहे. दोन दिवसांत ४८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
करंजा-उरण येथील एका रुग्णाला कोरोनाची लागण झाली होती. रुग्णाच्या आई-वडिलांच्या निधनानंतर सांत्वनासाठी मोठ्या संख्येने नागरिक, नातेवाइकांनी गर्दी केली होती.
कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या १४३ जणांना क्वॉरंटाइन करण्यात आले होते. यापैकी पहिल्या टप्प्यातील तपासणीनंतर रविवारी २१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले तर सोमवारी ३३ रुग्णांच्या तपासणीनंतर आणखी २७ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली. त्यामुळे उरणमध्ये कोरोनाबाधितांची संख्या ५१ झाली आहे. आणखी काही जणांचे अहवाल प्रलंबित आहेत.