- वैभव गायकर पनवेल : रोजगारानिमित्त खारघरमध्ये आलेल्या मराठवाड्यातील ११ कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. उस्मानाबादमधील पपलनगर येथील हे रहिवासी असून बेरोजगारीमुळे त्यांच्यावर भीक मागण्याची वेळ आली आहे.नवी मुंबईत अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभे राहत आहेत. या ठिकाणी रोजगाराच्या शोधात हजारो नागरिक येतात आणि मिळेल त्या जागी झोपड्या बांधून राहतात. जानेवारी महिन्यातच एकूण २५ कुटुंबे खारघरमध्ये दाखल झाली होती. मिळेल ते काम करून कुटुंबीयांचा उदरनिर्वाह ते करीत होते. मात्र कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाउन करण्यात आला आणि त्यांचा रोजगार बुडाला. गावी परण्यासाठीही साधन नसल्याने आणि जवळची पदरमोडही संपल्याने त्यांच्यावर भीक मागण्याची वेळ आली आहे.सध्याच्या घडीला ११ कुटुंबे खारघर सेक्टर १५ व १२ ला जोडणाऱ्या रस्त्यालगतच्या झोपड्यांमध्ये वास्तव्यास आहेत. खायला अन्न नाही आणि हाताला काम नसल्याने आम्हाला आमच्या मूळ गावी पाठवा, अशी विनवणी ६४ वर्षीय मोहन पवार करीत आहेत. कोरोनाच्या काळात काही जणांनी मदत केली, मात्र सध्या कोणीही फिरकत नसल्याचे सावित्री पवार यांनी सांगितले.कोरोनाचा धोका वाढत असताना आमची हीच परिस्थिती राहिल्यास उपासमारीने आमचा भूकबळी जाईल, असे रहिवाशांचे म्हणणे आहे. शासनाने आम्हाला मूळ गावी पाठविण्याची व्यवस्था करावी, अशी व्याकूळ विनंती ते करीत आहेत.
coronavirus: मराठवाड्यातील ११ कुटुंबे अडकली खारघरमध्ये, लॉकडाउनमुळे परतीचा प्रवासही थांबला, आली उपासमारीची वेळ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 12:35 AM