Coronavirus: मॉर्निंग वॉक करणाऱ्या १७ जणांवर गुन्हा; सीबीडी पोलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 07:49 PM2020-04-11T19:49:17+5:302020-04-11T19:49:37+5:30
अनेकजण कायद्याचे उल्लंघन करून मॉर्निंग वॉक करत आहेत. यामुळे उद्यान व मॉर्निंग वॉकच्या इतर ठिकाणी नागरिकांची गर्दी होत आहे.
नवी मुंबई : लॉकडाऊन व संचारबंदी असतानाही मॉर्निंग वॉक करणाऱ्या सतरा जणांवर सीबीडी पोलिसांनी कारवाई केली आहे. पारसिक हिल व उद्यानात सकाळच्या वेळी मॉर्निंग वॉक करताना या व्यक्ती आढळून आल्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले आहे. यानंतरही अनेकजण कायद्याचे उल्लंघन करून मॉर्निंग वॉक करत आहेत. यामुळे उद्यान व मॉर्निंग वॉकच्या इतर ठिकाणी नागरिकांची गर्दी होत आहे.
त्यामुळे सीबीडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दिनकर मोहिते यांच्या पथकाने शनिवारी सकाळी पारसिक हिल व इतर ठिकाणी धडक दिली. यावेळी सतरा व्यक्ती मॉर्निग वॉकसाठी घरातून बाहेर निघाल्याचे आढळून आले. त्यांच्यावर साथीचे रोग अधिनियम अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर कोरोनाला आळा घालण्यासाठी नागरिकांनी घरातच राहणे आवश्यक असल्याने लॉकडाऊन चे आदेश असे पर्यंत अत्यावश्यक कारणाव्यतिरिक घराबाहेर न निघण्याचे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहिते यांनी केले आहे.