- नामदेव मोरे नवी मुंबई : कोरोना रुग्णांवर उपचार करताना गृहविलगीकरणासही प्राधान्य मिळू लागले आहे. आतापर्यंत १४ हजार ७ रुग्णांनी घरामध्ये उपचार घेऊन कोरोनावर मात केली असून सद्य:स्थितीमध्ये ६२६ जणांवर उपचार सुरू आहेत.नवी मुंबई महानगरपालिकेने कोरोना नियंत्रणासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. रुग्णांची संख्या लक्षात घेऊन उपचार केंद्रे सुरू केली आहेत. रुग्णांच्या संख्येच्या दुपटीपेक्षा जास्त बेड शहरात उपलब्ध आहेत. रुग्णालयाबरोबरच गृहविलगीकरणासही प्राधान्य देण्यात येत आहे. आतापर्यंत ७,९४५ पुरुषांनी व ६,०६१ महिलांनी घरामध्ये उपचार घेऊन कोरोनावर मात केली आहे. सद्य:स्थितीमध्ये ३१ टक्के रुग्णांवर घरामध्ये उपचार सुरू असून, मनपाने त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी विशेष यंत्रणा तयार केली आहे. होम आयसोलेशन सुरू असलेल्या रुग्णांना नागरी आरोग्य केंद्राच्या वतीने औषधे पुरविण्यात येतात. या रुग्णांशी संवाद साधण्यासाठी काॅल सेंटर सुरू करण्यात आले आहे. काॅल सेंटरच्या माध्यमातून प्रतिदिन या रुग्णांशी संवाद साधला जात असून, या रुग्णांच्या उपचारावर लक्ष दिले जात आहे. - अभिजित बांगर, आयुक्त, महापालिका प्रशासनाची गृहविलगीकरणासाठी काय व्यवस्था ? नवी मुंबई महानगरपालिकेने गृहविलगीकरण सुरू असलेल्या रुग्णांची काळजी घेण्यासाठी काॅल सेंटर सुरू केले आहे. प्रत्येक रुग्णास नियमित संपर्क साधून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली जात आहे. गृहविलगीकरण करण्यात येणाऱ्या रुग्णांना महानगरपालिकेच्या वतीने पाच दिवसांचे औषणांचे किट उपलब्ध करून देण्यात येते. ही औषधे देण्याबरोबर नियमितपणे त्यांच्या प्रकृतीची चाैकशी करण्यात येत आहे. गृह विलगीकरणासाठी काय अटी?गृहविलगीकरणासाठी रुग्णाच्या घरामध्ये स्वतंत्र खोली असणे आवश्यक आहे. काळजी घेण्यासाठी केअर गिव्हर असणे आवश्यक आहे. औषध वेळेवर, पेपर व इतर साहित्य वेळेवर देण्यासाठी काळजीवाहक गरजेचा आहे. साैम्य लक्षणे असणाऱ्या व कोणतीही सहव्याधी नसणाऱ्यांना गृहविलगीकरण केले जाते.
coronavirus: नवी मुंबईत ६२६ रुग्ण घेत आहेत घरीच उपचार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2020 12:04 AM