Coronavirus: नवी मुंबईत कोरोनाच्या ८० टक्के चाचण्या निगेटिव्ह; मृत्युदर कमी करण्यात यश
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 12:05 AM2020-08-26T00:05:14+5:302020-08-26T00:05:38+5:30
नवी मुंबईकरांना दिलासा, पाच महिन्यांत साडेतीन लाख नागरिक क्वारंटाइन
नामदेव मोरे
नवी मुंबई : कोरोनाच्या संकटातून नवी मुंबईकरांची सुटका होऊ लागली आहे. रुग्णवाढीपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. एकूण चाचण्यांपैकी फक्त २० टक्के संशयितांचे अहवाल पॉझिटिव्ह येत असून, तब्बल ८० टक्के अहवाल निगेटिव्ह येऊ लागले आहेत. मृत्युदरही साडेतीनवरून सव्वादोन टक्क्यांवर आला आहे.
राज्यातील कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव सुरू असलेल्या शहरांमध्ये नवी मुंबईचाही समावेश आहे. शहरातील कोरोना रुग्णांची संख्या २३ हजारांपेक्षा जास्त झाली आहे. बळींचा आकडाही साडेपाचशेच्या घरात गेल्यामुळे नागरिकांमधील असुरक्षितता वाढली होती, परंतु महानगरपालिकेने ‘मिशन ब्रेक द चेन’ अभियान सुरू केल्यापासून परिस्थिती बदलू लागली आहे. मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी रुग्ण वाढले तरी चालतील, पण एकही मृत्यू होता कामा नयेत, अशी स्पष्ट भूमिका घेऊन जास्तीतजास्त चाचण्या करण्यावर लक्ष केंद्रित केले. प्रत्येक नोडमध्ये अँटिजेन चाचण्या करणारी केंद्र सुरू केली.
कंटेन्मेंट झोनमध्ये विशेष अँटिजेन चाचणी शिबिर घेण्यास सुरुवात केली. नेरुळमधील मनपा रुग्णालयात स्वत:ची प्रयोगशाळा सुरू करण्यात आली. यामुळे चाचणीचा अहवाल येण्यास होणारा विलंब पूर्णपणे थांबला. प्राथमिक लक्षणे असतानाच रुग्ण निदर्शनास आल्यामुळे त्यांच्यावर उपचार करणे सहज शक्य झाले आहे. कोविड केअर सेंटर, कोविड हेल्थ सेंटर व डेडिकेटेड कोविड रुग्णालयांची व त्यामधील उपलब्ध बेडची माहिती ही संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे.
महानगरपालिकेच्या उपाययोजनांमुळे सोमवारपर्यंत शहरात १ लाख १४ हजार ७१४ नागरिकांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. यामधील तब्बल ९१ हजार ८५ नागरिकांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. निगेटिव्ह अहवाल येण्याचे प्रमाण तब्बल ८० टक्के आहे.
याच कालावधीमध्ये २३,६२९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, हे प्रमाण २० टक्के आहे. महानगरपालिकेने आतापर्यंत ३ लाख ४२ हजार नागरिकांना क्वारंटाइन केले आहे. त्यापैकी पावणेतीन लाख नागरिकांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण झाले आहे. जुलैच्या सुरुवातीला नवी मुंबईमध्ये कोरोना बळींचे प्रमाण साडेतीन टक्क्यांवर गेले होते. मनपाने केलेल्या उपाययोजनांमुळे हे प्रमाण सव्वादोन टक्क्यांवर आले आहे.
नवी मुंबईमध्ये कोरोनाचा मृत्युदर कमी होत आहे. एकूण चाचण्यांपैकी पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याचे प्रमाण फक्त २० टक्के आहे. कोरोनामुक्त होण्याचे प्रमाणही वाढत आहे, परंतु तरीही नागरिकांनी गाफील राहू नये. मास्कचा वापर करावा. सामाजिक अंतराच्या नियमांचे काटेकोर पालन करावे व कोरोनामुक्त नवी मुंबई करण्यासाठी सहकार्य करावे. - अभिजीत बांगर, आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका
चाचण्यांविषयी संभ्रम नको
पालिकेने अँटिजेन चाचण्यांचे प्रमाण वाढविले आहे. प्रतिदिन दोन ते तीन हजार नागरिकांच्या चाचण्या करून तत्काळ अहवाल उपलब्ध करून दिला जात आहे. अनेक नागरिक प्राथमिक लक्षणे दिसली की, तत्काळ तपासणी करून घेत आहेत, परंतु काही जण चाचणी करू नका. लक्षणे नसली, तरी पॉझिटिव्ह अहवाल येतो, अशी अफवा पसरवत आहेत. यामध्ये काहीही तथ्य नाही. ज्या नागरिकांमध्ये लक्षणे आहेत किंवा जे कोरोना रुग्णांच्या संपर्कात आले आहेत, त्यांनी तत्काळ तपासणी करून घेणे आवश्यक आहे.
मुख्यमंत्र्यांनीही व्यक्त केले समाधान
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी ठाणे येथे आढावा बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली. नवी मुंबईमधील मृत्यूचे प्रमाण कमी होत असल्याबद्दल व रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. यापुढेही गाफील न राहता, योग्य उपाययोजना सुरू ठेवण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले.
१५ टक्के रुग्ण शिल्लक
शहरातील रुग्णांची संख्या चोवीस हजारांच्या टप्प्यावर पोहोचली आहे. यामधील ८३ टक्के रुग्ण बरे झाले आहेत. सव्वादोन टक्के रुग्णांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीमध्ये साडेचौदा ते १५ टक्के रुग्णच शिल्लक आहेत. सोमवारी उपचार सुरू असलेल्या रुग्णांचा आकडा ३,४१६ एवढाच होता.
नागरिकांचे सहकार्य हवे
नवी मुंबईमधून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन शर्थीचे प्रयत्न करत आहे. निकराच्या लढाईत नागरिकांचे सहकार्य हवे आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला, तरी पूर्णपणे थांबलेला नाही. धोका अजून कायम आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करावे. स्वत:ची, कुटुंबीयांना व शहरवासीयांना कोरोनापासून वाचविण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.